तासगाव : येथील तासगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस आमदार रोहित पाटील यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी बँकेच्या संचालक मंडळाने त्यांचा विशेष बैठकीत सत्कार करून बँकेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
चेअरमन महेश्वर हिंगमिरे व उपाध्यक्ष कुमार शेटे यांनी आमदारांचे स्वागत केले. प्रास्ताविक संचालक विनय शेटे यांनी केले. चेअरमन हिंगमिरे यांनी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबाबत माहिती देताना सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष शेटे यांनी बँकेच्या विकासात सर्वांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
आमदार पाटील यांनी बँकेचा अहवाल व प्रगतीची आकडेवारी पाहून समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या "पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक (पुणे विभाग)" पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आमदार पाटील यांच्याकडून या बैठकीत कल्याण निधीस रु. ११,००० चा धनादेश प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. गजानन खुजट, माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब सावंत, स्वप्नील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक विनय शेटे यांनी संचालक मंडळातर्फे सर्वांचे आभार मानले.