कोल्हापूर श्री वीरशैव को-ऑप. बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे प्रधान कार्यालय ताराराणी चौक, कोल्हापूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात अध्यक्ष श्री. महादेव साखरे, संचालक व सभासदांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश पूजन करून झाली. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात श्री. महादेव साखरे यांनी बँकेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला व सभासदांना १०% लाभांश जाहीर केला. बँकेने चालू साली एकत्रित व्यवसायात २००० कोटींचा टप्पा पार केला आहे. बँक निरंतर सभासद, ग्राहक, ठेवीदार यांचे हित जपत असून बँकेचा ताळेबंद भक्कम केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जोखीम व्यवस्थापन, सुव्यवस्थापन व अनुपालन यावर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.
आपली बँक ठेवीदाराला जास्तीत जास्त व्याज देवून कर्जदाराला माफक व्याजदरात कर्ज पुरवठा करत आहे, असे सांगितले. बँकेच्या ठेवी ११६३ कोटी व कर्जे ६६३ कोटी तसेच गुंतवणूक ४२९ कोटी असा एकूण २००० कोटींचा व्यवसाय झाला असून बँकेने ४.०७ कोटी नफा मिळवला आहे. Net NPA ०.७३% इतका आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेस ऑडिट वर्ग “अ” कायम केला आहे. बँक मल्टीस्टेट असून बँकेचा शेड्युल्ड दर्जा प्राप्त करण्याचा मानस आहे. बँकेने त्यासाठी प्रस्ताव तयार केला असून लवकरच रिझर्व्ह बँकेस पाठविण्यात येणार आहे.
आपल्या बँकेमार्फत ग्राहकांना कोअर बँकिंग, ए.टी.एम.,कॅश रिसायक्लर मशीन, यु.पी.आय (Google Pay, PhonePe) सेवा, 24x 7 दिवस आर.टी.जी.एस., एन.ई. एफ.टी., एस.एम. एस., मोबाईल बँकिंग, पॉस मशिनव्दारे खरेदीची सुविधा, वेबसाईट, "पे - पॉईंट", इंटरनेट बँकिंग (View Mode) त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या असून बँक लवकरच आपल्या ग्राहकांना डोअर स्टेप बँकिंग सुविधा देणार आहे.
सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन सरव्यवस्थापक श्री. दिगंबर कुंभार व इतिवृत्ताचे वाचन बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री.रोहित पाटील यांनी केले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश पाटील यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे सविस्तर वाचन केले व यावर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. बहुतांश सभासदांनी चर्चेत भाग घेतला. सभासदांना सायबर सिक्युरिटी बाबतचे प्रशिक्षण देण्याकरिता बँकेचे Virtual CISO श्री. हेमंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या सूचना उपयुक्त असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.
सभेत सभासदांच्या वतीने बँकेने केलेल्या उत्तुंग कामकाजाबाबत बँकेचे अध्यक्ष श्री. महादेव साखरे यांचा सत्कार ज्येष्ठ सभासद गजानन सुलतानपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे १० वी, १२ वी, पदविका, पदवी, पदव्युतर झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गजानन खुजट, विजय मुंगूरवाडी, अशोक नाईक, हसन देसाई या सभासदांचा विविध संस्थाच्या पदाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. नानासाहेब नष्टे यांचा सत्कार सभासद श्री. विद्याधर खोबरे यांच्या हस्ते झाला. सदर सभेस बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, चंद्रकांत स्वामी, डॉ. दिलीप चौगुले, शकुंतला बनछोडे, राजेंद्र शेटे, अनिल सोलापुरे, अनिल स्वामी, राजेंद्र लकडे, रंजना तवटे, डॉ. सतीश घाळी, वैभव सावर्डेकर, राजेंद्र माळी, श्रीमती श्वेता हत्तरकी, सिद्धार्थ मजती, व्यवस्थापन मंडळ सदस्य अरविंद माने, सुरेश कोळकी, सुनील पाटील, शेखर देसाई, प्रशांत मगदूम, सौ. सरलाताई पाटील, सुनील गाताडे, राजशेखर वाली, रावसाहेब पाटील, सचिन विश्वासराव पाटील व मान्यवर सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सहा. सरव्यवस्थापक अतुल माळी यांनी केले. संचालक श्री. राजेश पाटील चंदूरकर यांनी आभार मानले.