सोलापूर: सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभाराने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सोलापुरातील अग्रगण्य श्री महावीर अर्बन को-ऑप. बँक लि. ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवींमध्ये २८ कोटी रुपयांची भरीव वाढ झाली असून, बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात तब्बल ५०० कोटींच्या व्यवहारांचा टप्पा पार करून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वच आर्थिक निकषांवर बँकेने आपली पकड मजबूत केली आहे:
एकूण ठेवी: ५३१ कोटी रुपये.
एकूण कर्जे: ३७० कोटी रुपये.
ढोबळ नफा: ९ कोटी रुपये.
एन.पी.ए. (NPA): केवळ १.१५% (बँकेच्या दर्जेदार कर्ज वसुलीचे प्रतीक).
सहकारी बँकिंगमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही बँक आघाडीवर आहे. अवघ्या एका वर्षात ५०० कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार पूर्ण करून बँकेने या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. बँकेच्या अत्याधुनिक मोबाईल बँकिंग ॲपद्वारे ग्राहकांना RTGS, NEFT, IMPS आणि UPI यांसारख्या सेवा अत्यंत सुलभपणे वापरता येत आहेत.
बँकेच्या आजवरच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत अनेक प्रतिष्ठित संस्थांनी बँकेला 'आदर्श बँक', 'उत्कृष्ट बँक' आणि 'सर्वोत्तम अध्यक्ष' अशा विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.
सध्या बँकेच्या सहा शाखा कार्यरत असून, लवकरच 'माधव नगर' येथे बँकेची स्वमालकीची नवी शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
"बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतक यांनी दाखवलेल्या अतूट विश्वासामुळेच श्री महावीर बँक यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे," असा विश्वास बँकेचे चेअरमन इंदरमल जैन, दिपक मुनोत आणि व्हाईस चेअरमन संजय सेठिया यांनी व्यक्त केला आहे.