वरिष्ठ अधिकाऱ्याला १० लाखांचा फटका; सायबर गुन्हेगारांचा डल्ला! 
Co-op Banks

वरिष्ठ अधिकाऱ्याला १० लाखांचा फटका; सायबर गुन्हेगारांचा डल्ला!

खात्यात अडथळा लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा संपूर्ण डाव उघड

Prachi Tadakhe

पनवेल : कामोठे येथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित कंपनीतील वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याला तब्बल १० लाख ६८ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण नरवडे (वय ३७) असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी संपूर्ण नियंत्रण मिळवत अवघ्या काही दिवसांत मोठा डल्ला मारला.

अचानक व्यवहार बंद; बँकेकडे धाव

नरवडे यांना आपल्या खात्यातून कोणताही व्यवहार होत नसल्याची शंका आल्याने त्यांनी तातडीने कामोठे येथील बँकेत धाव घेतली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती दिली—
३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान त्यांच्या खात्यातून २३ संशयित व्यवहार झाले होते, त्यामुळे सुरक्षा कारणास्तव खाते ब्लॉक करण्यात आले होते.

सायबर चोरट्यांची मोठी खेळी : दोन इंस्टा जम्बो लोन

नरवडे यांनी बँकेचे स्टेटमेंट तपासल्यावर फसवणुकीचा संपूर्ण डाव उघड झाला.
सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावावर—

  • ₹5,11,000

  • ₹5,04,479

अशी दोन इंस्टा जम्बो लोन रक्कम काढली होती.

लोनचे एफडीमध्ये रूपांतर; त्याच दिवशी तोडून पैसे उडवले

चोरट्यांनी या दोन्ही लोनची एकूण रक्कम म्हणजे ₹10,15,479, ही त्याच दिवशी फिक्स डिपॉझिट (FD) बनवली.
त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी एफडी तोडून ही संपूर्ण रक्कम वेगवेगळ्या खात्यांत हलवण्याचा प्लॅन राबवला.

पुढील दोन दिवसांत ही रक्कम "गिफ्ट"च्या नावाखाली २३ विविध बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आले असल्याचे खात्रीशीर पुरावे समोर आले आहेत.

पगाराची रक्कमही लंपास

याचसोबत चोरट्यांनी नरवडे यांच्या मूळ पगाराची ₹55,343 ही रक्कमही परस्पर काढून घेतली असल्याचे उघड झाले.

सायबर पोर्टल व कामोठे पोलिसांत गुन्हा दाखल

फसवणूक लक्षात येताच नरवडे यांनी त्वरीत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधित खात्यांच्या ट्रान्सफर रेकॉर्ड्स व डिजिटल ट्रेल तपासले जात आहेत.

सायबर फसवणूक वाढतेय; नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

या प्रकारामुळे पुन्हा एकदा सायबर सुरक्षेबाबत जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते—

  • अनोळखी लिंक, OTP, कॉल किंवा अॅप डाउनलोड करू नयेत

  • नेटबँकिंग सुविधांसाठी अधिकृत अॅपच वापरावा

  • बँकेकडून OTP किंवा PIN कधीही विचारले जात नाही

  • संशयास्पद व्यवहार दिसल्यास तात्काळ बँक आणि सायबर पोर्टलवर तक्रार करावी

SCROLL FOR NEXT