देवगिरी नागरी सहकारी बँक  देवगिरी नागरी सहकारी बँक
Co-op Banks

देवगिरी बँकेचा विकास: शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवून नवा अध्याय

मराठवाड्यातील पहिली शेड्युल्ड बँक: देवगिरी बँकेचा यशस्वी प्रवास

Pratap Patil

छत्रपती संभाजीनगर  (महाराष्ट्र) येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळालेला आहे.ही मान्यता मराठवाड्यातील सहकार क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरली आहे. २३ जानेवारी १९८४ रोजी स्थापन झालेली ही बँक तिच्या ३३ शाखा, अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र, आधुनिक डेटा सेंटर आणि मुख्य कार्यालयाद्वारे कार्यरत आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष किशोर दादा शितोळे यांनी सांगितले की, "आमच्या बँकेच्या सर्व शाखा आणि कार्यालये सुसज्ज, पूर्णपणे संगणकीकृत आणि एकमेकांशी जोडलेली आहेत.देवगिरी नागरी सहकारी बँक ही मराठवाड्यातील पहिली बँक आहे जी तिच्या कामकाजासाठी कोअर बँकिंग पॅटर्न निवडते. बँक आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे आणि तिच्या ग्राहकांना उत्कृष्ट तसेच जलद सेवा प्रदान करत आहे. त्यामुळे बँकेला शेडयुल्ड बँकेचा दर्जा नक्की मिळेल" असा विश्वास व्यक्त केला होता.

ते पुढे म्हणाले की, देवगिरी  बँक विकासाच्या मार्गावर आहे आणि नेहमीच नवीन उंची गाठण्यासाठी वचनबद्ध आहे. कोणतेही चुकीचे कर्ज वितरित केले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी बँक सर्व कर्ज अर्जांचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करते. ही आमची बांधिलकी आहे. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेचा एकुण व्यवसाय हा रु. २०४.०९ कोटीने वाढून रु.२४१९.८८ कोटी इतका झाला आहे. एकूण व्यवसायात बँकेने ९.२१% एवढी वाढ केली आहे. ठेवींमध्ये १०.७७% तर कर्जात ६.९०% एवढी वाढ झाली आहे. कर्ज ठेवीचे प्रमाण (सीडी रेशो) हा ६५% एवढा राखण्यात बँकेस यश मिळाले आहे. जे की कर्जवाढीतील चांगल्या मागणीचे आणि ठेवींच्या नियोजित संकलनाचे द्योतक आहे.

बँकेचा निव्वळ नफा हा रु. ३९.२४ कोटी एवढा असून, बँकेने याही वर्षी विक्रमी नफा कमविण्याची परंपरा कायम राखली आहे. त्याचप्रमाणे बँकेकडे एकूण थकित कर्जापेक्षा जास्त तरतूद असल्यामुळे, निव्वळ अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण याही वर्षी ०% राखले आहे. तसेच बँकेचे भांडवल पर्यात्पता गुणोत्तर (CRAR) ३०.८२% एवढे असून, ते रिझर्व्ह बँकेच्या नियामक मानकापेक्षा खुपच वर आहे. भक्कम राखीव निधी व ०% नेट एनपीए यामुळे बँकेचे जोखीम व्यवस्थापन (Risk Management), मालमत्ता गुणवत्ता (Asset Quality) आणि भांडवली मजबुती यावर बँकेची असलेली दक्षता दर्शविते.

देवगिरी नागरी सहकारी बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा देत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  नमूद केले आहे की, "भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ (१९३४ चा २) च्या कलम ४२ च्या उपकलम (६) च्या कलम (अ) नुसार, भारतीय रिझर्व्ह बँक याद्वारे 'देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर' ला सदर कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश देत आहे."

आधुनिकतेकडे वाटचाल – लवकरच इंटरनेट बँकिंग सेवा सुरू

देवगिरी बँकेस इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी देखील रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळालेली असून, ही सेवा लवकरच ग्राहकांसाठी कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे डिजिटल बँकिंगच्या सुविधांचा लाभ आता बँकेच्या खातेदारांना मिळणार आहे.

भारतात सुमारे १,४२३ नागरी सहकारी बँका आहेत, ज्यांचा एकूण व्यवसाय अंदाजे ४.१३ लाख कोटी रुपयांचा आहे. चालू आर्थिक वर्षात विश्वेश्वर सहकारी बँक, अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँक आणि देवगिरी नागरी सहकारी बँक या तीन शहरी सहकारी बँकांचा समावेश झाल्यामुळे, अनुसूचित शहरी सहकारी बँकांची एकूण संख्या आता ५२ झाली आहे.

SCROLL FOR NEXT