अध्यक्ष मा.खासदार श्री. नितीन पाटील, श्री.अनिल देसाई, संचालक श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. प्रदीप विधाते, डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या हस्ते हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Co-op Banks

सातारा जिल्हा बँकेची अतिवृष्टीग्रस्तांना १.२२ कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

Pratap Patil

सातारा: येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ रुपयांची भरीव मदत केली आहे. मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष मा.खासदार श्री. नितीन पाटील, उपाध्यक्ष श्री.अनिल देसाई, संचालक श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या हस्ते हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

राज्यात उद्भवलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक नागरिक आणि कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी बँकेने केलेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा हातभार लागणार असलेचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेली ही भरीव मदत आहे. पूर असो वा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मदतीसाठी सातारा जिल्हा बँक राज्यातच नव्हे, तर देशभरात आदर्श कार्यप्रणालीसाठी ओळखली जाते.

बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बॅंकिंग कामकाजाबरोबर जिल्ह्यातील विकासाभिमुख कामात बँक नेहमीच अग्रेसर असून महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधितांना मदत करण्यासाठी बँक त्यांच्या मदतीला धावली आहे, ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने पूर परिस्थितीत दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने आजपर्यंत विविध प्रकारे सर्वतोपरी मदत केलेली आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष खासदार श्री. नितीन पाटील म्हणाले, बँकेमार्फत रक्कम रु. १ कोटी तसेच बँक अधिकारी व सेवक यांच्या एक दिवसाच्या पगाराची रक्कम आणि संचालक यांचे एका सभा भत्याची अशी एकूण १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ इतकी रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणेत आली. सातारा जिल्हा बँक, बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे.

डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सामाजिक बांधिलकी केवळ आताच्या पूरग्रस्तांच्या मदतीपुरतीच मर्यादित नाही, तर बँकेने यापूर्वीही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेव्हा-तेव्हा आपला मदतीचा हात पुढे केला आहे. बँकेने हे सातत्याने सिद्ध केले आहे की, सातारा जिल्हा बँक केवळ एक वित्तीय संस्था नसून, समाजाप्रती जबाबदारी जपणारी आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढे येणारी संस्था आहे.

SCROLL FOR NEXT