बँकेच्या अध्यक्षा कल्पना येवला व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर  
Co-op Banks

सटाणा मर्चंट्स को-ऑप.बँकेची वार्षिक सभा संपन्न

१० टक्के लाभांश जाहीर, ब्राह्मणगाव शाखेसह सेवांच्या विस्ताराचे उद्दिष्ट!

Pratap Patil

सटाणा: येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देतानाच शाखा विस्ताराची मागणी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा कल्पना येवला यांनी केले. बँकेच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

सभेत शहरातील मुख्य शाखेच्या नूतनीकरणासह नामपूर, ताहाराबाद, डांगसौंदाणेनंतर आता ब्राह्मणगाव येथे शाखा सुरू करण्याचा ठराव करण्यात आला. याबाबत नरेंद्र अहिरे यांनी सूचना केली तर नरेंद्र मालपाणी यांनी अनुमोदन दिले.

बँकेच्या ठेवी ११७ कोटी, कर्जवाटप ६४ कोटी, सरकारी रोख्यांमध्ये ५९ कोटी, तर इतर बँकांमध्ये १७ कोटी रुपयांची गुंतवणूक असून, बँकेला १ कोटी ७५ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लेखापरीक्षणात बँकेला 'अ' वर्ग मानांकन मिळाल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

सभासदांच्या वतीने सामुदायिक विवाह योजना सुरू करणे, मृत्युंजय योजनेच्या निधीत वाढ करण्यासह नोकरभरती पारदर्शकपणे व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे, शशिकांत कापडणीस, केशव मांडवडे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, अमित सोनवणे, रामकृष्ण येवला, राजेंद्र अहिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

सभेला उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, डॉ. विठ्ठल येवलकर, सचिन कोठावदे, ॲड. महेश देवरे, अभिजित सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रवीण बागड, भास्कर अमृतकर, रूपाली कोठावदे, प्रकाश सोनग्रा, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, तुषार खैरनार, अशोक गुळेचा, विजय भांगडिया, दत्तात्रेय कापुरे, पियुष येवला आदींसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन देवीदास चागडे यांनी केले. इतिवृत्त वाचन भरत पवार यांनी केले, तर कैलास येवला यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT