सटाणा: येथील अग्रगण्य वित्तीय संस्था असलेल्या सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० रोजी स्थानिक सप्तपदी लॉन्स येथे अत्यंत उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिलीप येवला होते. सभेमध्ये बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून सभासदांसाठी १५ टक्के लाभांश वाटपाची घोषणा करण्यात आली.
सभेचा प्रारंभ स्वागत आणि प्रास्ताविकाने झाला. संचालक पंकज ततार यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संचालक सचिन कोठावदे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बँकेची उद्दिष्टे व गेल्या वर्षातील ठळक कामगिरीचा पट मांडला. यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी गत वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले.
लाभांश आणि नियम दुरुस्तीस मंजुरी
या वार्षिक सभेत बँकेने उत्तम आर्थिक कामगिरीच्या जोरावर सभासदांना १५ टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्याचा निर्णय घेतला, ज्यास उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. यासोबतच बँकेच्या सुलभ कामकाजासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पोटनियमांमधील दुरुस्तीलाही सभेत एकमुखाने मंजुरी देण्यात आली.
सभेच्या दरम्यान बँकेच्या विविध धोरणांवर आणि भविष्यातील योजनांवर व्यापक चर्चा झाली. या चर्चेत बँकेचे ज्येष्ठ सभासद अनुक्रमे रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, जिभाऊ आबा सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, प्रा. चंद्रकांत सोनवणे, नरेंद्र अहिरे, नरेंद्र मालपाणी, महेंद्र शर्मा, आण्णा काशिराम सोनवणे, सुभाष सोनवणे, शशिकांत कापडणीस, अंबादास देवरे, हेमंत जाधव, राजेंद्र अहिरे, रोहित तरटे व सचिन दशपुते आदींनी सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
या सभेला व्यासपीठावर व्हाईस चेअरमन चंद्रकांत सोनवणे यांच्यासह सर्वश्री संचालक मंडळ पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्नील बागड, विठ्ठल येवलकर, सचिन कोठावदे, महेश देवरे, अभिजित सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रवीण बागड, भास्कर अमृतकर, कल्पना येवला, प्रकाश सोनग्रा, जगदीश मुंडावरे, तुषार खैरनार, अशोक गुळेचा, दत्तात्रेय कापुरे, विजय भांगडीया, पीयूष येवला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे प्रमुख उपस्थित होते.
सभेचा निरोप घेताना संचालक जयवंत येवला यांनी उपस्थितांचे आणि सभासदांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने सभा सुरळीत पार पडली.