धनादेश 
Co-op Banks

आता चेक वटणार ज्या त्या दिवशीच!

रिझर्व्ह बँकेचे अद्ययावत 'पेमेंट सेटलमेंट नेटवर्क' कार्यान्वित!

Pratap Patil

व्यवहार पूर्ततेसाठी पेमेंट (देयक) म्हणून दिलेला धनादेश (चेक) शनिवार ४ ऑक्टोबरपासून त्याच दिवशी, काही तासांतच वटणार आहे. रिझर्व्ह बँकेची यासाठी आवश्यक पेमेंट सेटलमेंट नेटवर्क (देयक व्यवहार प्रणाली) कार्यान्वित होणार आहे. सरकारी बँकांतून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांसारख्या खासगी बँकांनीही चेक बँकेत भरल्यापासून काही तासांतच तो वटवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

या नव्या प्रणालीअंतर्गत, ४ ऑक्टोबरपासून जमा केलेले धनादेश त्याच दिवशी काही तासांत वटवले (क्लिअर केले जातील) जातील. धनादेश न वटता परत जाणे (बाऊन्स होणे) टाळण्यासाठी खात्यात पुरेशी शिल्लक ठेवावी आणि विलंब किंवा नकार टाळण्यासाठी धनादेशाचे सर्व तपशील अचूक भरावेत,असे आवाहन दोन्ही बँकांनी ग्राहकांना केले आहे.

सध्या बँका चेक ट्रंकेशन (पडताळणी) सिस्टीम (सीटीएस) वापरतात, ज्यामध्ये धनादेशाची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा आणि त्याचे तपशील धनादेश काढलेल्या बँकेकडे पाठवले जातात. यामुळे धनादेशाचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्याची गरज दूर होते, परंतु ड्रॉप बॉक्स किंवा एटीएममध्ये जमा केल्यास सेटलमेंटसाठी सहसा दोन कामाचे दिवस लागतात.

आरबीआयने जाहीर केले आहे की, सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंटचा पहिला टप्पा ४ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा ३ जानेवारी, २०२६ पासून सुरू होणार आहे.

धनादेश वटण्यासाठी पुढील काळजी घ्या:

•ग्राहकांनी चेक लिहिताना त्यातील सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करावी.

•शब्दांत लिहिलेली रक्कम व अंकांमधील रक्कम जुळली पाहिजे,

•चेकवरील तारीख वैध असावी व तीन महिन्यांपूर्वीची नसावी.

•चेक ज्याला दिला आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा रकमेमध्ये खाडाखोड नसावी.

•धनादेश देणाऱ्याची स्वाक्षरी बँकेच्या नोंदीशी जुळणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेसाठी या गोष्टी ध्यानात ठेवा:

•बँकांनी ग्राहकांना सुरक्षा वाढवण्यासाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली (Positive Pay System) वापरण्याचेही आवाहन केले आहे. या प्रणालीमध्ये पडताळणीसाठी धनादेशाचे महत्त्वाचे तपशील आधीच सादर करणे आवश्यक आहे.

•५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे धनादेश जमा करण्यापूर्वी, खातेधारकांनी किमान २४ तास आधी बँकेला खाते क्रमांक, धनादेश क्रमांक, तारीख, रक्कम आणि लाभार्थ्यांचे नाव ही माहिती देणे बंधनकारक आहे.

•धनादेश सादर झाल्यावर बँक या तपशीलांची पडताळणी करेल. माहिती जुळल्यास धनादेश क्लिअर केला जाईल, अन्यथा विनंती नाकारली जाईल आणि धनादेश देणाऱ्या व्यक्तीला तपशील पुन्हा सादर करावा लागेल,

•ग्राहकांनी धनादेशाचे तपशील विशिष्ट प्रादेशिक ई-मेलवर पाठवणे आवश्यक आहे. प्रक्रियेपूर्वी, बँक पावती मिळाल्याचा पोचपावती संदेश पाठवेल.

SCROLL FOR NEXT