RBI च्या अहवालातील महत्त्वाचे संकेत 
Co-op Banks

भू-राजकीय तणावामुळे आर्थिक वाढीवर, महागाईवर अल्पकालीन दबाव: आरबीआय

युद्ध, महागाई आणि आर्थिक अस्थिरता : RBI च्या अहवालातील महत्त्वाचे संकेत

Vijay chavan

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धसदृश परिस्थिती, वाढते कच्च्या तेलाचे दर, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे भारताच्या आर्थिक वाढीवर आणि महागाईवर अल्पकालीन दबाव निर्माण होऊ शकतो, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिला आहे. आगामी पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवर RBI च्या 2025-26 वार्षिक अहवालात ही चिंता व्यक्त करण्यात आली.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव, आर्थिक बाजारातील अस्थिरता, व्यापारातील अनिश्चितता आणि हवामानातील बदल यांचा परिणाम देशांतर्गत वाढ आणि महागाईवर होऊ शकतो. “अत्यंत अनिश्चित जागतिक परिस्थितीत सतत बदलणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून योग्य धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले

रिझर्व्ह बँकेच्या मते, पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा दरात वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो. तसेच महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास पुरवठा साखळीवर ताण वाढू शकतो. यामुळे उद्योगांच्या नफ्यावर आणि बँकांच्या कर्जपोर्टफोलिओवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तरीही भारताची आर्थिक वाढीची दिशा सकारात्मक असल्याचे रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम मर्यादित राहील, या गृहितकावर 2026-27 साठी भारताचा वास्तविक GDP वाढदर 6.9 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या अंदाजाला खालच्या दिशेचे धोके असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, रुपया डॉलरच्या तुलनेत 95 च्या आसपास अस्थिर राहिला असून, अमेरिका-इराण संघर्षामुळे परदेशी गुंतवणूक बाहेर जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही RBI ने निदर्शनास आणले. इंधन दरवाढीमुळे महागाईवर अतिरिक्त दबाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

खतांसह महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरही भू-राजकीय तणावाचा परिणाम होऊ शकतो. मात्र सरकार विविध स्रोतांद्वारे खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहू शकते, असे RBI ने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT