बंगळुरू : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियामक निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी कर्नाटकातील तीन सहकारी बँकांवर एकूण ₹५.५० लाखांचा दंड ठोठावला आहे.
हंगुंड येथील श्री विजय महांतेश को-ऑपरेटिव्ह बँकेला ₹२.५० लाख,प्रगती को-ऑपरेटिव्ह बँकेला ₹२ लाख, तर होसापेटे येथील विकास सौहार्द को-ऑपरेटिव्ह बँकेला ₹१ लाखांचा दंड करण्यात आला आहे.
RBIच्या तपासणीत संबंधित बँकांकडून कर्जवर्गीकरण आणि NPA नोंदणीसंदर्भातील नियमांचे पालन न झाल्याचे आढळले. तसेच संचालक आणि त्यांच्या संबंधित व्यक्तींना कर्ज देणे, एक्सपोजर मर्यादा आणि गुंतवणूक पोर्टफोलिओशी संबंधित काही नियामक नियमांचेही उल्लंघन झाल्याचे तपासणीत समोर आले.
RBIने संबंधित बँकांकडून प्राप्त झालेले स्पष्टीकरण तसेच वैयक्तिक सुनावणी दरम्यान मांडण्यात आलेली बाजू विचारात घेतल्यानंतर दंडाची कारवाई केली.
RBIने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई नियामक अनुपालनातील त्रुटींशी संबंधित आहे. या दंडाचा बँकांनी ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होत नाही. ग्राहक व्यवहारांबाबतच्या करारांच्या वैधतेवर भाष्य करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे RBIने स्पष्ट केले आहे.