Master Direction on Note Sorting Machines 
Co-op Banks

रिझर्व्ह बँकेचे नोट सॉर्टिंग मशीनबाबत नवे निर्देश

बंद उत्पादनातील नोट सॉर्टिंग मशीन 30 जून 2027 पर्यंत हटवावी; पुढे केवळ BIS (भारतीय मानक ब्युरो ) प्रमाणित मशीनची खरेदी करण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश

Vijay Chavan

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोट सॉर्टिंग मशीनबाबत नवीन Master Direction on Note Sorting Machines जारी केले आहे. नोटांची अस्सलता तपासणे, फिटनेसच्या आधारे नोटांचे वर्गीकरण करणे तसेच खराब, संशयित आणि चलनातून बाद केलेल्या नोटांची योग्य छाननी करण्यासाठी या निर्देशांमध्ये विविध निकष निश्चित करण्यात आले आहेत.

अस्सलता तपासणी प्रथम

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार नोटांची फिटनेस तपासणी करण्यापूर्वी त्यांची अस्सलता तपासणी करणे आवश्यक आहे. मशीनने संशयित बनावट नोटा तसेच चलनात पुनर्वापरासाठी अयोग्य असलेल्या नोटा विश्वसनीय आणि सातत्यपूर्ण पद्धतीने वेगळ्या करणे अपेक्षित आहे. RBIने एखाद्या विशिष्ट मूल्यवर्गातील नोटांची मालिका चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यास, त्या नोटा त्यांची भौतिक स्थिती चांगली असली तरी ‘Unfit’ म्हणून वर्गीकृत कराव्या लागतील.

खराब नोटांसाठी स्पष्ट निकष

नोट सॉर्टिंग मशीनने मळलेल्या, कमी कडकपणा आलेल्या, कोपरे दुमडलेल्या, फाटलेल्या, छिद्र असलेल्या, डाग पडलेल्या, लिहिलेल्या, जास्त दुमडलेल्या किंवा रंग उडालेल्या नोटा ओळखून ‘Unfit’ म्हणून वेगळ्या करणे अपेक्षित आहे. टेप, कागद किंवा गोंद वापरून दुरुस्त केलेल्या नोटांसाठीही स्वतंत्र निकष देण्यात आले आहेत.

उदाहरणार्थ, 8 चौरस मिलिमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे छिद्र असलेली नोट ‘Unfit’ मानली जाईल. तसेच नोटेच्या लांबी किंवा रुंदीमध्ये 5 मिलिमीटरपेक्षा जास्त घट होईल अशा प्रकारे दुमडलेली नोटही अयोग्य म्हणून वर्गीकृत करावी लागेल.

तिमाही तपासणी बंधनकारक

बँकांनी नोट सॉर्टिंग मशीनची अचूकता आणि सातत्य तिमाही आधारावर तपासणे आवश्यक आहे. गरज असल्यास मशीनचे पुनःकॅलिब्रेशन करावे लागेल. या तपासणीचे प्रमाणपत्र बँक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह नोंदवहीत ठेवण्याचे निर्देश RBIने दिले आहेत.

तिमाही तपासणीसाठी किमान 2,000 खराब नोटांचा टेस्ट डेक तयार करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. यामध्ये उपलब्धतेनुसार ₹100 जुन्या मालिकेतील, ₹100 नव्या मालिकेतील, ₹200 आणि ₹500 मूल्यवर्गातील नोटांचा समावेश केला जाऊ शकतो. फिटनेस तपासणीसाठी स्वीकार्य त्रुटी मर्यादा 5 टक्के आहे; मात्र FICNs (बनावट भारतीय चलनी नोटा) बाबत शून्य सहनशीलता ठेवण्यात आली आहे.

30 जून 2027 पर्यंत जुनी मशीन हटवावी

रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी आणखी महत्त्वाची मुदत निश्चित केली आहे. बँकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आणि उत्पादनातून बंद झालेल्या Note Sorting Machines (NSMs) 30 जून 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने हटवाव्या लागतील. या मुदतीचे पालन न झाल्यास संबंधित मास्टर डायरेक्शननुसार दंडात्मक तरतुदी लागू होऊ शकतात. यापुढे बँकांनी केवळ BIS - भारतीय मानक ब्युरो (Indian Standard Bureau) प्रमाणित Note Sorting Machines खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

BISने नोट सॉर्टिंग मशीनसाठी IS 18663:2024 हे मानक 19 मार्च 2024 रोजी भारताच्या राजपत्रात प्रकाशित केले आहे.

बँकांच्या रोख व्यवस्थापनावर परिणाम

या निर्देशांमुळे बँकांच्या शाखा, कॅश विभाग आणि करन्सी चेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोट सॉर्टिंग मशीनच्या कार्यक्षमतेकडे अधिक काटेकोरपणे पाहावे लागणार आहे. मशीनची तिमाही चाचणी, आवश्यक पुनःकॅलिब्रेशन, नोंदवही आणि जुन्या मॉडेल्सचे वेळेत अपग्रेडेशन याकडे बँकांना विशेष लक्ष द्यावे लागेल.

रिझर्व्ह बँकेने या मास्टर डायरेक्शनच्या माध्यमातून नोट सॉर्टिंग मशीनशी संबंधित पूर्वीच्या विविध परिपत्रकांना एकत्रित करून अद्ययावत निर्देश एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. या मास्टर डायरेक्शनच्या जारी तारखेपासून संबंधित पूर्वीची परिपत्रके मागे घेण्यात आली आहेत.

Master Direction on Note Sorting Machines.pdf
Preview
SCROLL FOR NEXT