गडहिंग्लज : महाराष्ट्र, कर्नाटक व दिल्ली या विस्तृत कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सलग सहाव्यांदा बिनविरोध पार पडली. स्थापनेपासून आजपर्यंत सभासदांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत यंदा बिनविरोध निवडणुकीचा षटकार मारला असून, सहकार क्षेत्रात एक सकारात्मक व आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
संस्थेचे मुख्य कार्यालय गडहिंग्लज येथे असून आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी व धारवाड अशा १५ शाखांमधून संस्थेचा विस्तारलेला कारभार सुरू आहे.
सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी मल्टिस्टेट सहकारी कायद्यानुसार पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
दि. २९ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. १३ जागांसाठी १३ अर्ज दाखल झाले.
दि. १ डिसेंबर रोजी झालेल्या छाननीत सर्व अर्ज वैध ठरले.
दि. २ डिसेंबर रोजी एकही उमेदवार माघार न घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
मल्टिस्टेट कायद्यानुसार बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना दिल्ली येथील सहकारी निवडणूक प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर, निवडणूक कार्यक्रमानुसार दि. १९ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळात अनुभव, सातत्य व नव्या विचारांचा योग्य समन्वय दिसून येतो.
नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे आहेत :
संस्थापक अध्यक्ष – एम. एल. चौगुले
उपाध्यक्षा – मीना रिंगणे
ज्येष्ठ संचालक – प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर
प्रा. डॉ. किरण पोतदार
डॉ. संजय चौगुले
सुशांत करोशे
प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील
महेश मजती
प्रा. डॉ. मनोहर पुजारी
सुहास नाडगौडा
बाबासाहेब आजरी
पी. आर. शिंगटे
राजश्री कोले
यामध्ये ९ विद्यमान संचालकांना पुनर्नियुक्ती, तर ४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे.
संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी सलग सहाव्यांदा निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले. सभासदांचा संस्थेवरील विश्वास, पारदर्शक कारभार, शिस्तबद्ध व्यवस्थापन व आर्थिक शुचिता यामुळेच ही परंपरा कायम राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
सहकार चळवळीत मतभेदांऐवजी एकमताचा आदर्श घालून देणारी ही निवडणूक भविष्यातील सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.