नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेने (Punjab & Sind Bank) देशभरात स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officers - JMGS I) या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. या भरतीतून एकूण ७५० अधिकारी पदांवर पात्र उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रिया २० ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. यासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये उमेदवारांची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
राज्यनिहाय रिक्त पदे:
बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १०० पदे, ओडिशा व तमिळनाडूत प्रत्येकी ८५ पदे, आंध्र प्रदेशात ८० पदे, कर्नाटकात ६५ पदे, तर पंजाबमध्ये ६० पदे भरली जाणार आहेत. इतर राज्यांमध्ये तुलनेने कमी जागा आहेत. उमेदवारांना मात्र एकाच राज्यासाठी अर्ज करता येईल, अशी स्पष्ट अट अधिसूचनेत नमूद केलेली आहे.
पात्रता निकष :
• शैक्षणिक पात्रता : भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation).
• अनुभव: सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी पदावरील किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक. खाजगी बँक, सहकारी बँका किंवा NBFC मधील अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही.
• वयोमर्यादा: अर्जदाराचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग आणि १९८४ च्या दंगलीतील पीडितांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयातील सवलत लागू होईल.
• इतर अटी : उमेदवारांकडे किमान ६५० CIBIL स्कोअर असणे आवश्यक आहे. तसेच, विद्यमान कर्मचारी या पदासाठी पात्र ठरणार नाहीत.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड तीन टप्प्यातील प्रक्रियेतून होईल :
१. ऑनलाइन परीक्षा : इंग्रजी भाषा, बँकिंग ज्ञान, सामान्य ज्ञान/अर्थव्यवस्था आणि संगणक ज्ञान या चार विषयांवर आधारित १२० गुणांची प्रश्नपत्रिका असेल.
२. वैयक्तिक मुलाखत : लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
३. स्थानिक भाषेची चाचणी : उमेदवाराने अर्ज केलेल्या राज्यातील स्थानिक भाषा वाचन, लेखन आणि समजण्यास सक्षम आहेत की नाही, याची चाचणी घेतली जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) लेखी परीक्षा (७०% गुणांचे प्रमाण ) आणि मुलाखत (३०% गुणांचे प्रमाण) यावर आधारित तयार केली जाईल.
वेतनमान आणि सेवा अटी:
• निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० ते ₹८५,९२० या वेतनश्रेणीमध्ये पगार मिळेल. याशिवाय महागाई भत्ता (DA), भाडे भत्ता (HRA), वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि इतर शासकीय सोयी लागू होतील.
• निवड झालेल्या अधिकाऱ्यांना किमान ३ वर्षे ६ महिने सेवा बजावणे बंधनकारक असेल. राजीनामा दिल्यास तीन महिन्यांच्या पगाराएवढी बाँड रक्कम भरावी लागेल.
• उमेदवारांना सुरुवातीला केवळ त्याच राज्यात नेमणूक मिळेल, ज्या राज्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. मात्र, १२ वर्षांनंतर किंवा SMGS-IV पदावर बढती मिळाल्यावर देशातील कोणत्याही शाखेत बदली होऊ शकते.
महत्त्वाच्या तारखा:
• ऑनलाइन अर्ज सुरू : २० ऑगस्ट २०२५
• अर्जाची अंतिम तारीख : ४ सप्टेंबर २०२५
• ऑनलाइन परीक्षा : ऑक्टोबर २०२५
बँकेचे आवाहन: बँकेने अधिसूचनेत स्पष्ट केलेले आहे की, अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइनच होणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.punjabandsindbank.co.in वरून अर्ज करावा. तसेच, सर्व अद्ययावत सुधारणा किंवा दुरुस्त्या केवळ बँकेच्या संकेतस्थळावरच प्रकाशित केल्या जाणार आहेत.