पुणे: अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या पुणे पीपल्स सहकारी बँकेच्या तावरे कॉलनी (पर्वती, पुणे) येथील स्वमालकीच्या देखण्या, अद्ययावत आणि सुविधासंपन्न मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन सोहळा व संचालक मंडळ सभागृहाचे उद्घाटन मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडले.
हा सोहळा महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक सदस्य मा. श्री. विजयकांतजी कोठारी आणि मा. श्री. पन्नालालजी लुणावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकारी संस्था टिकण्याचे मर्म 'विश्वास आणि आपुलकी' - माधुरीताई मिसाळ
सोहळ्यात बोलताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या, "ग्राहकांचा विश्वास, आपुलकीची सेवा आणि थेट संपर्क हेच सहकारी संस्था टिकण्याचे, वाढण्याचे आणि विकसित होण्याचे मुख्य मर्म आहे. पुणे पीपल्स बँक हे याचे उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण आहे."
बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी प्रास्ताविकात बँकेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, "गेल्या ७५ वर्षांत अनेक चढ-उतारांवर मात करत बँकेने ही प्रगती साधली आहे. स्वमालकीचे मुख्य कार्यालय नसल्याची खंत मनात होती. परंतु १० वर्षांपूर्वी संचालक मंडळाने ही जागा खरेदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी बांधकाम क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा वापर करून या वास्तूला परिपूर्ण आणि देखणे रूप दिले आहे."
आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड म्हणाले, "अमृत महोत्सवी वर्षात बँकेचे स्वमालकीचे मुख्य कार्यालय सभासद व ग्राहकांच्या सेवेत अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही स्वप्नपूर्ती झाली आहे. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षात बँकेने तब्बल ३५७ कोटी रुपयांची विक्रमी व्यवसाय वाढ नोंदवली आहे."
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार बँकेच्या संचालक मंडळ व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, तसेच बँकिंग, सहकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना निघोजकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बँकेच्या संचालिका सौ. वैशालीताई छाजेड यांनी मानले.