पुणे: सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरील सदस्यांची सचोटी, प्रामाणिकपणा व व्यवस्थापनातील कौशल्य हे वादातीत असेल अशाच बँका या स्पर्धेत टिकून मोठया होतात, त्या वर्गवारीत पुणे पीपल्स बँक बसते व त्यामुळे बँकेने रु.४०० कोटीवरुन रु.२७५० कोटी इतका व्यवसाय टप्पा पार केला असुन चालू आर्थिक वर्षात रु.५०० कोटींचे व्यवसाय वाढीचे ध्येय ठरविले आहे ही बाब उल्लेखनीय आहे.
बँकेने इतर बँकांशी स्पर्धा करताना सर्व आधुनिक सोयी-सुविधा आपल्या ग्राहकांना दिल्या असल्यामुळेच हि प्रगती साधता आली असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे विधी व न्याय विभागाचे सचिव मा. श्री. सतिश वाघोले यांनी केले. ते पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या सोमवार पेठ शाखेच्या रास्ता पेठ, पुणे येथील स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीतील स्थलांतर उद्घाटन समारंभात बोलत होते.
शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या उद्घाटन समारंभास निवडणूक प्राधिकरणाचे उपायुक्त मा. श्री. बाळासाहेब तावरे, मा. नगरसेवक श्री. विशाल धनवडे व श्री. योगेश समेळ, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. निलेश ढमढेरे, ज्येष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र माळवदकर, बँकेचे मान्यवर ग्राहक, खातेदार, हितचिंतक तसेच बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अॅड. सुभाष मोहिते यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल बँकिंग सुविधा, विविध आकर्षक कर्ज व ठेव योजना यांसह सोमवार पेठ शाखा आजपासून ग्राहक सेवेसाठी पूर्णतः कार्यान्वित होत आहे.
“विश्वास ठेवावा असा विश्वस्त” हे ब्रीद वाक्य घेऊन सहकार तत्वांचे पालन करत सुरक्षा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकहित या त्रिसूत्रीवर बँकेने काम केले. गेल्या १७ वर्षांत बँकेचा एकूण व्यवसाय रु. ४०० कोटींवरून रु. २७५० कोटींपर्यंत नेण्यात यश मिळाले आहे.
०% एनपीए आणि सभासदांना १२ ते १५ टक्के दराने लाभांश ही बँकेची मोठी ताकद असल्याचे अॅड. मोहिते यांनी अधोरेखित केले.
बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी सांगितले की, बँक पुढील वर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. तज्ञ संचालकांचे मार्गदर्शन आणि निष्ठावंत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बँक अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मार्च २०२६ अखेर किमान रु. ५०० कोटी व्यवसायवाढ
- पुढील २–३ वर्षांत एकूण व्यवसाय रु. ५००० कोटींवर नेण्याचा निर्धार
- डायरेक्ट मेंबरशिप व शेड्यूल्ड बँक दर्जा मिळवण्याचा आत्मविश्वास
असा स्पष्ट रोडमॅप त्यांनी मांडला.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. निलेश ढमढेरे यांनी स्वमालकीच्या इमारतीतील स्थलांतरामुळे बँकेच्या विश्वासार्हतेत लक्षणीय वाढ होईल, असे सांगत अल्पावधीत साधलेल्या प्रगतीबद्दल बँकेचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय भोंडवे (प्र.) यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. सुचेता चिवटे यांनी केले.