पुणे: महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून पुणे येथील बँक कर्मचारी संघातर्फे सदाशिव पेठ येथील कार्यालयात आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांकडून आणि बँक कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य तपासणीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
आरोग्य उपक्रमासोबतच या प्रसंगी बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगारांचे हक्क, त्यांच्या सेवा अटी आणि आगामी नवीन कामगार कायदे या विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शहरातील अनेक राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये प्रामुख्याने दीपक मानकर (माजी उपमहापौर), विद्याधर अनास्कर (प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक), नीलेश ढमढेरे (अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन), ॲड. सुभाष मोहिते (मानद सचिव), संग्राम गायकवाड (संचालक, जिजामाता महिला सहकारी बँक), तुषार केवटे (संचालक, लक्ष्मीकृपा बँक), हर्षवर्धन मानकर (नगरसेवक), राघवेंद्र मानकर आदी मान्यवर उपस्थित होते
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी बँक कर्मचारी संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये बँक कर्मचारी संघाचे ज्येष्ठ सल्लागार भरत पासलकर, अध्यक्ष गिरीश मेंगे, जनरल सेक्रेटरी सुनील देसाई, तसेच नितीन देशमुख, सचिन कदम, प्रमोद जाधव, संजय पायुगडे, मंगेश पवार आणि भाऊ तुपे यांचा समावेश आहे.
या शिबिरामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली असून, कामगार कायद्यांविषयीच्या मार्गदर्शन सत्रामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.