सटाणा मर्चेंटस् को-ऑप. बँकेचे नूतन अध्यक्ष प्रवीण बागड तर उपाध्यक्ष भास्कर अमृतकर याची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करताना संचालक. 
Co-op Banks

सटाणा मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण बागड, तर उपाध्यक्षपदी भास्कर अमृतकर

आवर्तन पद्धतीनुसार नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड; नवीन शाखांच्या विस्तारावर देणार भर

Prachi Tadakhe

सटाणा: सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. ('समको') च्या अध्यक्षपदी प्रवीण बागड, तर उपाध्यक्षपदी भास्कर अमृतकर यांची बुधवारी (दि. ३०) अविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार तत्कालीन अध्यक्ष दिलीप येवला व उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर बँकेच्या मध्यवर्ती सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान अध्यक्षपदासाठी प्रवीण बागड आणि उपाध्यक्षपदासाठी भास्कर अमृतकर यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाले होते. अध्यक्षपदासाठी प्रवीण बागड यांच्या अर्जाला महेश देवरे हे सूचक, तर अभिजित सोनवणे अनुमोदक होते. उपाध्यक्षपदासाठी भास्कर अमृतकर यांच्या अर्जाला जयवंत येवला सूचक, तर सचिन कोठावदे हे अनुमोदक होते. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सटाणा सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी या निवडी अविरोध घोषित केल्या व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रवीण बागड म्हणाले की, "सटाणा मर्चंट बँकेची उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवत, बँकेच्या आर्थिक विकासाला गती देणे आणि नवीन शाखांचा विस्तार करून ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक सेवा पुरवणे यावर आमचा विशेष भर असेल."

यावेळी संचालक कैलास येवला, डॉ. विठ्ठल येवलकर, जगदीश मुंडावरे आणि सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या सभेस बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. बागडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT