चांगला क्रेडिट स्कोअर असूनही लोन का नाकारले 
Co-op Banks

चांगला क्रेडिट स्कोअर असूनही लोन का नाकारले जाते?

फक्त सिबिल स्कोअर नाही; बँका पाहतात ‘हे’ आर्थिक निकषही

Vijay chavan

आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेणे अत्यंत सोपे झाले आहे. अवघ्या काही मिनिटांत मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड करून इन्स्टंट लोन मिळवता येते. विशेषतः नोकरदार आणि व्यावसायिक वर्गासाठी ही सुविधा मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरत आहे.

मात्र, अनेकदा एक विचित्र परिस्थिती समोर येते. ग्राहकाचा सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच अत्यंत चांगला असतो, तरीदेखील पर्सनल लोन अर्ज नाकारले जाते . “स्कोअर चांगला असूनही लोन का मिळाले नाही?” असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात, बँका आणि डिजिटल लेंडिंग कंपन्या केवळ क्रेडिट स्कोअरच्या आधारावर निर्णय घेत नाहीत. त्यामागे इतरही अनेक आर्थिक निकष तपासले जातात.

मासिक उत्पन्न आणि विद्यमान कर्जांचा भार

कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँका ग्राहकाचे निव्वळ मासिक उत्पन्न तपासतात. ग्राहकावर आधीपासून असलेले होम लोन, कार लोन, क्रेडिट कार्डचे थकबाकी हप्ते आणि नवीन कर्जाचा संभाव्य ईएमआय यांचा एकत्रित विचार केला जातो.

जर उत्पन्नाचा मोठा हिस्सा आधीच कर्जफेडीत जात असेल, तर ग्राहकाची परतफेड क्षमता कमी असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत सिबिल स्कोअर चांगला असूनही अर्ज नाकारला जाऊ शकतो.

नोकरी किंवा व्यवसायातील स्थिरता महत्त्वाची

फक्त मोठा पगार असणे पुरेसे नसते, तर नोकरीतील सातत्य आणि स्थिरता देखील महत्त्वाची असते. एखाद्या नामांकित कंपनीत किंवा सरकारी सेवेत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या व्यक्तींना बँका कमी जोखमीचे ग्राहक मानतात.

याउलट, वारंवार नोकऱ्या बदलणारे, नवीन स्टार्टअपमध्ये कार्यरत असलेले किंवा कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या व्यक्तींबाबत बँका अधिक सावध भूमिका घेतात.

मजबूत ‘क्रेडिट हिस्ट्री’ नसणे

अनेक वेळा ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर ७५०+ असतो, पण त्याची क्रेडिट हिस्ट्री फारच कमी किंवा मर्यादित असते. म्हणजेच, ग्राहकाने यापूर्वी मोठे कर्ज घेतलेले नसते किंवा क्रेडिट कार्डचा वापर अत्यल्प केलेला असतो.

अशा वेळी बँकेकडे ग्राहकाच्या आर्थिक शिस्तीचा पुरेसा इतिहास उपलब्ध नसतो. मजबूत ट्रॅक रेकॉर्ड नसल्यामुळे बँका कर्ज मंजुरी देताना सावधगिरी बाळगतात.

कमी कालावधीत वारंवार कर्जासाठी अर्ज

जेव्हा ग्राहक वेगवेगळ्या बँका किंवा लोन अॅप्सवर सतत कर्जासाठी अर्ज करतो, तेव्हा प्रत्येकवेळी क्रेडिट रिपोर्टवर ‘हार्ड इन्क्वायरी’ नोंदवली जाते.

अल्प कालावधीत अनेक चौकशा दिसल्यास बँकांना ग्राहक आर्थिक तणावात असल्याचा संकेत मिळू शकतो. त्यामुळे अर्ज मंजूर होण्याची शक्यता कमी होते.

कर्ज अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

  • सिबिल स्कोअर ७५० पेक्षा अधिक ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • विद्यमान ईएमआय आणि कर्जांचे प्रमाण नियंत्रित ठेवा.

  • नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता राखा.

  • वारंवार कर्जासाठी अर्ज करणे टाळा.

  • क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा.

  • दीर्घकालीन आणि मजबूत क्रेडिट हिस्ट्री तयार करा.

निष्कर्ष:- उच्च सिबिल स्कोअर हा कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा घटक असला, तरी तो एकमेव निकष नाही. ग्राहकाचे उत्पन्न, आर्थिक जबाबदाऱ्या, नोकरीतील स्थिरता, क्रेडिट हिस्ट्री आणि कर्जासाठी केलेल्या चौकशा यांचा एकत्रित विचार करूनच बँका अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे केवळ चांगला स्कोअर असून भागत नाही, तर एकूण आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता टिकवणेही तितकेच आवश्यक आहे.
SCROLL FOR NEXT