दि ओझर मर्चंट्स बँक 
Co-op Banks

दि ओझर मर्चंट्स बँकेला ४ कोटी १२ लाखांचा नफा; एकूण व्यवसाय २११ कोटींच्या पार

बँकेच्या समाधानकारक नफ्यामुळे यावर्षी सभासदांना योग्य लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा विचार आहे.

Prachi Tadakhe

ओझर: निफाड तालुक्याची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या 'दि ओझर मर्चंट्स को-ऑप बँकेने' कठीण आर्थिक परिस्थितीतही आपली प्रगतीची घौडदौड कायम राखली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला ४ कोटी १२ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, सर्व तरतुदी वजा जाता ९१ लाख २७ हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.

आर्थिक स्थिती आणि प्रगतीचा आलेख

बँकेने विविध आर्थिक निकषांवर भक्कम कामगिरी नोंदवली आहे:

  • ठेवी: मागील वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये ६ कोटी ७९ लाखांची वाढ होऊन त्या १२५ कोटी ५१ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत.

  • कर्ज वाटप: चालू आर्थिक वर्षात कर्ज वाटपात ९ कोटी ७२ लाखांची वाढ झाली असून एकूण कर्ज वाटप ८५ कोटी ५१ लाख रुपये झाले आहे.

  • एकूण व्यवसाय: बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे एकूण व्यवसायाने २११ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

  • भांडवल आणि निधी: बँकेचे वसूल भाग भांडवल ४ कोटी ३१ लाख रुपये असून, एकूण स्वनिधी २३ कोटी ३३ लाख रुपये इतका आहे.

  • खेळते भांडवल व गुंतवणूक: बँकेचे खेळते भांडवल १५८ कोटी १४ लाख रुपये असून एकूण गुंतवणूक ५९ कोटी ८८ लाख रुपये आहे.

बँकेची आर्थिक मजबूती

बँकेने आपले आर्थिक गुणोत्तर अतिशय भक्कम राखले आहे:

  • बँकेचा सी.डी. रेशो ६८.१३% असून सी.आर.ए.आर. २०.७८% इतका समाधानकारक आहे.

  • एन.पी.ए. (NPA) नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून, निव्वळ एन.पी.ए. ४.३५% तर ढोबळ एन.पी.ए. १५.५४% पर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.

सभासदांना लाभांश देणार

नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाचे कोसळलेले भाव अशा आव्हानात्मक स्थितीतही ठेवीदारांनी बँकेवर विश्वास दाखवला आहे. या यशामुळे संचालक मंडळाने या आर्थिक वर्षात सभासदांना योग्य लाभांश देण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच, अनियमित कर्जदारांनी आपले हप्ते वेळेवर भरून सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.

उपस्थित मान्यवर

या प्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन प्रवीण लढढा, जनसंपर्क संचालिका मंगला कदम, संचालक सर्वश्री भालचंद्र कासार, रवींद्र भट्टड, विजय शिंदे, भारत पल्हाळ, लक्ष्मण सोनवणे, नंदलाल चोपडा, योगेश चांडक, प्रवीण वाघ, रऊफ पटेल, शरद सिन्नरकर, निळकंठ कदम, श्रीकांत कदम, गणेश बोरस्ते, तसेच जिजाबाई रास्कर, डॉ. मेघा पाटील, ज्योती भट्टड कार्यलक्षी संचालक अरुण पवार, तज्ञ संचालक अॅड. भूषण जाजू, रोहन कुमार गंगवाल (सी.ए.), बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष संदीप अक्कर, सदस्य भारत आहेर, नवनाथ मंडलिक, तक्रार निवारण समितीचे सदस्य शिरीष कावळे, मुबीन पठाण, विष्णु पगार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद वालझाडे, प्रशासकीय कार्यालय प्रमुख दत्तात्रय बापट, जनरल मॅनेजर (वसुली) मनसुखलाल छाजेड, आय.टी. विभाग प्रमुख साईनाथ पवार, अधिकारी वैभव जाधव, राकेश कदम यांसह कर्मचारी व मान्यवर इ. उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT