ऑनलाईन शॉपिंग फसवणूक हा सायबर गुन्हेगारीचाच एक प्रकार आहे. गुन्हेगार ग्राहकांना अतिशय कमी किमतीत दर्जेदार वस्तू देण्याचे आमिष दाखवून अशी बनावट खरेदी करण्यास प्रवृत्त करतात. याकरिता ते बनावट वेबसाइट तयार करतात किंवा वैध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये फेरफार करून अतिशय आकर्षक ऑफर देतात.अशा प्रकारे भुलून जाळ्यात आलेल्या ग्राहकांची ते वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरतात. त्यामुळे ग्राहकांचा आर्थिक तोटा होतोच शिवाय ऑनलाइन बाजारपेठांबद्दल ग्राहकांच्या मनात अविश्वास निर्माण होतो.
खबरदारी घेण्याच्या गोष्टी (Dos):
ऑफर केलेल्या किंमतींची विविध ई-कॉमर्स वेबसाईट्सवर उपलब्ध उत्पादनांच्या किंमतींशी तुलना करा.
जर ऑफर देणारी वेबसाईट संशयास्पद वाटत असेल, तर व्यवहारासाठी ‘कॅश-ऑन-डिलिव्हरी’ पेमेंट पद्धत निवडा.
वस्तू खरेदी करताना नेहमी ई-कॉमर्स साईटवर “Verified” किंवा “Trusted” म्हणून दर्शविलेल्या विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.
खूप आकर्षक वाटणाऱ्या ऑफरकडे सावधगिरीने पाहून अशा ऑफरची पडताळणी करा. संशयित बाबींकडे दुर्लक्ष करू नका
सुरक्षित व्यवहार करा: नेहमी लक्षात ठेवा, पैसे घेण्यासाठी तुम्हाला कधीही PIN, पासवर्ड किंवा OTP टाकण्याची गरजच नसते.
या गोष्टी टाळा (Don’ts):
सार्वजनिक नेटवर्क टाळा: सार्वजनिक संगणक किंवा Wi-Fi नेटवर्कवरून ई-शॉपिंग व्यवहार करू नका.
माहितीचे संरक्षण करा: संशयास्पद अविश्वसनीय वेबसाईट्सवर आपली कार्ड माहिती, जन्मतारीख, फोन नंबर इत्यादी सेव्ह करू नका.
विक्रेत्याची पडताळणी करा: OLX, Quikr सारख्या C2C प्लॅटफॉर्मवर विक्रेत्याची ओळख व विश्वासार्हता तपासल्याशिवाय आगाऊ पैसे देऊ नका.
QR कोडपासून सावध रहा: अनोळखी व्यक्ती WhatsApp किंवा Telegram वर पैसे देण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगत असेल, तर तो स्कॅन करू नका.