सोलापूर: सहकारी बँकिंग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नीलकंठ को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांसाठी डिजिटल सेवांचे नवे दालन खुले केले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बँकेच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य इमारतीसह मोबाईल बँकिंग, एटीएम, आयएमपीएस (IMPS) आणि युपीआय (QR Code) या अत्याधुनिक सेवांचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या सोहळ्याचे उद्घाटन 'प्रिझिजन कॅमशाफ्ट'चे संस्थापक यतीन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेच्या प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या आधुनिक ‘व्हीएलके सेंटर’ (Vision Leadership Knowledge Center) या मीटिंग हॉलचेही लोकार्पण करण्यात आले.
'कार्पोरेट' दर्जाच्या सोयीसुविधा
उद्घाटक यतीन शहा यांनी बँकेच्या प्रगतीचे कौतुक करताना सांगितले की, "नीलकंठ बँकेचे हे नवीन कार्यालय एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखे सुसज्ज आहे. ग्राहकांना हायटेक सुविधा दिल्याने बँकेचा नावलौकिक अधिक वाढेल."
संस्थापकांचा वारसा आणि आधुनिकतेची जोड
बँकेचे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी यावेळी बँकेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "१९९७ पासून संस्थापक कै. विश्वनाथ करवा यांचा विचारांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. नव्या डिजिटल सेवांमुळे ग्राहकांचा बँकिंग व्यवहार अधिक सुलभ आणि वेगवान होईल. तसेच 'व्हीएलके सेंटर'मुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि भविष्यातील नियोजनाला मोठी गती मिळेल."
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला बँकेचे व्हाइस चेअरमन पद्मा भुतडा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन कोस्तुभ करवा, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बलदवा, जनरल मॅनेजर सीए शुभम सोमाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळ, अधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री गाडगीळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कौस्तुभ करवा यांनी मानले.