नाशिक येथील नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेने आता या बँकेचे कंपनी ॲक्टनुसार स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला असून येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. संचालक मंडळ हे त्यास राजी झाले असले तरी सभासद काय भूमिका घेणार हे २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. नाशिक मर्चंट को-ऑप बँक ही नाशिक शहरातील जुनी बँक असून, बँकेचे कार्यक्षेत्र नाशिकच नव्हे तर मल्टीस्टेट झालेले आहे.
याबाबत बोलताना नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक म्हणाले की, "या बँकेने अनेक चढ-उतारानंतरही वाटचाल सुरु ठेवलेली आहे. कामकाजात अनियमिततेचा ठपका ठेवून बँकेवर काहीकाळ प्रशासकीय राजवटदेखील लागू करण्यात आली होती. असे अनेक अडथळे पार करत ही बँक अत्यंत चांगल्या पद्धतीने टिकून आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३७६१.२४ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून यात मागील वर्षीच्या तुलनेत ५३७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बँकेला मार्चअखेरीस ४१ कोटी ८० लाख ९८ हजार रुपये इतका नफा झाला आहे. बँकेचा ३१ मार्च २०२५ पर्यंत एनपीए ४.४० टक्के असून, निव्वळ एनपीए शून्य इतका आहे. बँकेची सभासद संख्याच सुमारे दोन लाख इतकी आहे. मात्र, आता नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची वाढती बंधने अडचणीची ठरत असल्याने सहकार कायद्याऐवजी कंपनी ॲक्टनुसार- स्मॉल फायनान्स बँक म्हणून ही बँक आता चालवण्यात येणार आहे."
• संचालकपद वाचविण्यासाठी प्रस्ताव; आरोपाचे अध्यक्षांकडून खंडन
केंद्र शासनाच्या नव्या सहकार कायद्याला बगल देण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक बनवण्यात येत असल्याचा आरोप बँकेच्या काही माजी संचालकांनी आणि सभासदांनी केला आहे. केंद्रीय सहकार खात्याने सहकारी बँकेत दहा वर्षांपर्यंतच संचालक राहता येईल, असा सहकारी बँकेसाठी नवा नियम लागू केला आहे.
या नियमाचे पालन झाल्यास नाशिक मर्चंट बँकेच्या सध्याच्या संचालक मंडळातील मोजकेच चार ते पाच संचालकच निवडणूक लढवू शकतील, शिवाय आत्ताप्रमाणे निवडणुकीसाठी सर्व सभासद मतदान करू शकणार नाहीत, त्यामुळे ही बँक कंपनी ॲक्टखाली आणण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोप होत आहे.
या आरोपाचा इन्कार करून बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक म्हणाले की, "कंपनी ॲक्ट खाली येणे हे बँकेला अधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आहे. कंपनी ॲक्टनुसार बँकेत संचालक घेताना त्यासाठी कंपनी कायद्याच्या नियमांमध्ये बसत असेल तर त्याला संचालक होता येते, शिवाय एखाद्या अनियमिततेबद्दल संचालकांवर सामूहिक नव्हे तर व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची तरतूद आहे. कंपनी ॲक्टनुसार बँकेच्या सर्व संचालकांची निवडणूक वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडूनच केली जाते."
बँकेचे स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर झाल्यास बँकेला शेतकऱ्यांना कर्ज देता येतील. तसेच या बँकेला सरकारी खात्यांच्या तसेच सहकारी बँकांच्या ठेवीदेखील घेता येतील. भागधारकांना त्याचा आर्थिक लाभ मिळू शकेल. रिझर्व्ह बँकेने स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व निकष नाशिक जिल्ह्यातून केवळ नामको बँकच पूर्ण करते. त्यामुळे हा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी सांगितले.
• दोन बँका "नामको" मध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव: अध्यक्ष हेमंत धात्रक
"नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेमध्ये नाशिक शहरातील दोन नागरी सहकारी बँका विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. नाशिकच्या महिला सक्षमीकरणात अग्रेसर असलेली नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक तसेच आर्थिक निर्बंध असलेली गणेश बँक विलीन करून घेण्यासाठी वार्षिक सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. संबंधित दोन्ही बँकांना नाशिक मर्चंट बँकेच्या वतीने असा प्रस्तावही देण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर तसेच संबंधित बँकांच्या होकारानंतर यासंदर्भात पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे."