नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक 
Co-op Banks

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक: २.७१ कोटींचा विक्रमी नफा

ठेवी, कर्ज आणि नफ्यात मोठी वाढ; एनपीए (NPA) घटला!

Prachi Tadakhe

नाशिक: नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपली घोडदौड कायम राखली असून, ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात मोठी वाढ नोंदवली आहे. बँकेने यावर्षी २ कोटी ७१ लाख रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. निलेश यादवराव देशमुख यांनी दिली.

व्यवसायात मोठी वाढ आणि एनपीएमध्ये घट

बँकेच्या एकूण व्यवसायाने यावर्षी ६६७.६२ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील वर्षी बँकेच्या ठेवी ३७०.४२ कोटी रुपये होत्या, त्या आता वाढून ३९४.४३ कोटी झाल्या आहेत. तसेच कर्ज वाटप २६८.१७ कोटींवरून २७३.१९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, बँकेने आर्थिक शिस्त पाळत आपला एनपीए (NPA) अत्यंत कमी राखला आहे. ढोबळ एनपीए २.८०% तर निव्वळ एनपीए ०.९१% पर्यंत खाली आला असून, यामुळे बँकेच्या आर्थिक सुदृढतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्जदार सभासदांना व्याजात सवलत

बँकेने आपल्या सभासदांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या NTL कर्जदार सभासदांना व्याजदरात अर्धा टक्का रिबेट (सवलत) जाहीर करण्यात आला आहे. यासाठी बँकेने ५९.७५ लाख रुपये खर्च केले आहेत. जास्तीत जास्त सभासदांनी नियमित कर्ज भरणा करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी: कन्यादान ठेव योजना

केवळ बँकिंग व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी म्हणून बँक 'राजमाता जिजाऊ मासाहेब कन्यादान ठेव योजना' राबवत आहे. या योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलीच्या विवाहासाठी ११,००० रुपयांची ठेव पावती कन्यादान म्हणून भेट दिली जात आहे. या योजनेचा सभासदांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

अद्ययावत बँकिंग सेवेचा निर्धार

बँकेच्या या यशाचे श्रेय ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्मचारी वर्गाला देताना उपाध्यक्ष श्री. रविंद्र रघुनाथ बाविस्कर म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात होणारे अद्ययावत बदल स्वीकारून सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. निलेश यादवराव देशमुख, संचालक श्री. प्रमोद भगवंतराव निरगुडे, श्री. अजित महेश आव्हाड, सौ. मंदाकिनी विलास पवार, श्री. महेश नारायण मुळे, सौ. धनश्री भालचंद्र कापडणीस, श्री. सुनिल तबाजी गिते, श्री. मोहन रामचंद्र गांगुर्डे, श्री. ज्ञानेश्वर शंकरराव माळोदे, श्री. जयंत रंगनाथ शिंदे, श्री. विजय पाटीलभाऊ देवरे, श्री. रमेश तुकाराम बोडके, श्री. अभिजीत रमेश घोडेराव, श्री. सचिन कल्याणराव विंचुरकर, श्री. विक्रम विश्वनाथ पिंगळे, श्री. अमोल सुभाष बागुल, श्री. विनोद विजय जवागे, श्री. भरत वसंत राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलींद गजानन आढे, व्यवस्थापक अण्णासाहेब त्रिंबकराव बडाख यांनी दिली. यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

SCROLL FOR NEXT