आर्थिक यशासोबतच सामाजिक बांधिलकी; शेतकऱ्यांसाठी १० कोटींची मदत आणि माजी सेवकांसाठी पेन्शन योजना. 
Co-op Banks

राज्य सहकारी बँकेचे आर्थिक यश: ७०२ कोटींचा विक्रमी नफा.

प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, पारदर्शक कारभार आणि तांत्रिक आधुनिकीकरणाच्या जोरावर राज्य बँकेने बँकिंग क्षेत्रात यशाची नवी उंची गाठली आहे.

Prachi Tadakhe

मुंबई: सहकार क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपली यशस्वी परंपरा कायम राखत बँकिंग क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. पारदर्शक कारभार, समाजभिमुख धोरणे आणि तांत्रिक आधुनिकीकरण या बळावर बँकेने ७०२ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवून यशाची नवी उंची गाठली आहे. प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने केलेली ही कामगिरी राज्याच्या सहकार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आव्हानात्मक परिस्थितीतही नफ्याचे सातत्य

बँकेने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने ६०० कोटी रुपयांहून अधिक नफा मिळविण्याचा विक्रम जपला आहे. सन २०२२ मध्ये ६०३ कोटींपासून सुरू झालेला हा प्रवास आता ७०२ कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२६ मध्ये जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे रोखे बाजार गडगडला होता. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार कराव्या लागलेल्या आर्थिक तरतुदींमुळे (Provisions) निव्वळ नफ्यात काही प्रमाणात घट झाली, अन्यथा हा नफा ९१० कोटी रुपयांच्या घरात गेला असता. असे असूनही बँकेने ५६,२५० कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय करत आपली आर्थिक पकड मजबूत ठेवली आहे.

सामाजिक जबाबदारीचे भान आणि शेतकरी मदत

आर्थिक प्रगती साधत असतानाच राज्य बँकेने सामाजिक 'ऋण' जपण्यातही पुढाकार घेतला आहे. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रुपयांची भरीव मदत दिली आहे. यासोबतच भारतीय खेळांच्या संवर्धनासाठी ९५ लाख रुपये आणि सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांना मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे.

माजी सेवकांसाठी 'आरोग्य आधार' आणि पेन्शन योजना

बँकेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या माजी सेवकांसाठी बँकेने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतले आहेत. सन २०२४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १०,००० रुपये पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, सर्व हयात माजी सेवकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी 'आरोग्य आधार' योजनेअंतर्गत दरमहा ५,००० रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी विशेष आर्थिक मदत दिली जात आहे.

देशातील पहिले 'सहकार सुरक्षा' सायबर सेंटर

डिजिटल युगात ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून बँकेने वाशी येथील प्रशासकीय इमारतीत 'सहकार सुरक्षा' या नावाने देशातील पहिले अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर उभारले आहे. सहकार क्षेत्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच सुसज्ज केंद्र असून, यामुळे ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांचे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. बँकेने यापूर्वीच UPI आणि QR कोड यांसारख्या आधुनिक सेवा सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या आहेत.

भक्कम आर्थिक पाया

बँकेची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत सुदृढ आहे. बँकेचा स्वनिधी ८,१६० कोटी रुपये असून नेटवर्थ ५,७४५ कोटींवर पोहोचले आहे. भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १८.३०% इतके असून नेट एनपीए १.६५% पर्यंत मर्यादित राखण्यात बँकेला यश आले आहे. सुयोग्य जोखीम व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे सामूहिक प्रयत्न यामुळेच ही ऐतिहासिक भरारी शक्य झाल्याचे बँकेने नमूद केले आहे.

SCROLL FOR NEXT