नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित मॉडेल को-ऑपरेटिव्ह बँकेला शेड्युल्ड बँक दर्जा दिला आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, रिझर्व्ह बँकेनेे "भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४" च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये बँकेचा समावेश केला आहे.
या नव्या दर्ज्यामुळे मॉडेल को-ऑप बँक आता चालू आर्थिक वर्षात शेड्युल बँकेचा दर्जा मिळवणारी चौथी नागरी सहकारी बँक बनली आहे. यापूर्वी, RBI ने पुण्यातील विश्वेश्वरा सहकारी बँक, छ.संभाजीनगर मधील देवगिरी नागरी सहकारी बँक, आणि अहिल्यानगर मधील अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक यांना ही मान्यता दिली होती.
शेड्युल बँक बनल्यामुळे बँकेला रिझर्व्ह बँके कडून बँक दराने कर्ज घेणे, क्लिअरिंग हाऊसमध्ये सहभागी होणे, आणि भागधारकांमध्ये आर्थिक विश्वासार्हता वाढवणे यासारख्या सुविधा मिळतील.
अनेक वर्षांपासून बँक शेड्युल दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होती आणि नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, बँकेने आपल्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला होता. सुमारे १,९०० कोटी रुपयांच्या व्यवसायासह, २०२४-२५ मध्ये बँकेचा निव्वळ नफा ७.२६ कोटी रुपये होता.