पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ८६ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रक्कम थेट बँक खात्यांत जमा करण्यात आली.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटी रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे.
प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अंतिम टप्प्यात
राज्यात सध्या १३ लाख ७० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही निधी तात्काळ जमा केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान
या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कर्जमुक्तीची मुख्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर ५० हजार रुपये वर्ग केले जातील.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.