मंगळवेढा : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि., सोलापूरच्या मंगळवेढा शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी कै. रमेश बंकट दत्तू यांच्या आकस्मिक निधनाने दत्तू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत कठीण प्रसंगी बँकेने आपल्या कर्मचारी कल्याणकारी धोरणाची जपणूक करत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. बँकेच्या टर्म पॉलिसी विमा योजनेअंतर्गत कै. रमेश दत्तू यांच्या पत्नी श्रीमती सुप्रिया दत्तू यांच्याकडे १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करून कुटुंबाला मोठा आर्थिक आधार देण्यात आला.
हा धनादेश बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह यांच्यासह बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कै. रमेश बंकट दत्तू यांनी बँकेत सेवेत असताना अत्यंत निष्ठा आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने लोकमंगल बँक परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखद प्रसंगी त्यांना भविष्यातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने बँकेने तत्परतेने विमा दाव्याची प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम उपलब्ध करून दिली.
"लोकमंगल बँक ही केवळ एक आर्थिक संस्था नसून आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे एक कुटुंब आहे. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात बँक परिवार पूर्णपणे सहभागी असून, या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला नक्कीच सावरण्यास मदत होईल." - बँक प्रशासन
धनादेश स्वीकारताना श्रीमती सुप्रिया दत्तू अत्यंत भावूक झाल्या होत्या. या वेळी बँक प्रशासनाने त्यांच्याप्रति तीव्र संवेदना व्यक्त करत, आगामी काळातही कुटुंबाला आवश्यक ते सर्व सहकार्य आणि साथ देण्याचा विश्वास दिला.
बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राबविलेल्या या टर्म पॉलिसी उपक्रमाचे मंगळवेढा परिसर आणि बँकिंग क्षेत्रातून विशेष कौतुक केले जात आहे.