नवीन शेतकरी सभासदांना लवकरच बिनव्याजी पीककर्ज; शुभमंगल योजनेतून मुलीच्या लग्नालाही शून्य टक्के व्याजाने मदत! 
Co-op Banks

लातूर जिल्हा बँकेकडून नवीन सभासदांना बिनव्याजी पीककर्ज; शुभमंगल योजनेचाही विस्तार

लातूर जिल्हा बँकेच्या ४३ व्या वार्षिक सभेत सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची घोषणा; ५ वर्षांत १५ हजार कोटींच्या उलाढालीचे ध्येय.

Prachi Tadakhe

लातूर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी आणि सभासदांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. जमिनीच्या वाटण्या, वारसा हक्क व अन्य कारणांमुळे नव्याने शेतकरी झालेल्या सभासदांना लवकरच जमिनीचे क्षेत्र व पिकांनुसार शून्य टक्के व्याजदराने (बिनव्याजी) पीककर्ज दिले जाणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सुरू करण्यात आलेल्या 'शुभमंगल' योजनेतील कर्जही आता ८ टक्के व्याजाऐवजी पूर्णपणे बिनव्याजी (०% व्याज) देण्याची ऐतिहासिक घोषणा बँकेचे मार्गदर्शक, सहकारमहर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली.

बँकेच्या मुख्यालयात गुरुवारी (दि. २०) रोजी पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख होते. या वेळी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार वैजनाथ शिंदे, संचालक अशोक पाटील निलंगेकर, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, अनंतराव देशमुख, अशोक काळे, शाम भोसले, सचिन पाटील, विजयकुमार पाटील निलंगेकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

सभेतील मुख्य निर्णय व महत्त्वाच्या घोषणा

  • बिनव्याजी पीककर्ज व शुभमंगल योजना: नवीन शेतकरी सभासदांना त्यांच्या जमिनीचे क्षेत्र आणि पिकांच्या गरजेनुसार बिनव्याजी पीककर्ज दिले जाईल. तसेच 'शुभमंगल' योजनेची कर्जमर्यादा वाढवून हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.

  • कर्मचारी व सोसायट्यांसाठी सवलती: सेवा सोसायट्यांना बँकेतर्फे दूरचित्रवाणी संच (टीव्ही) भेट दिला जाईल. बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस आणि १० टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली असून सोसायट्यांच्या गटसचिवांना २५ टक्के बोनस देण्यात येणार आहे.

  • व्यावसायिक उद्दिष्टे: बँकेची उलाढाल सध्या ९,२०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून ढोबळ नफा १०० कोटींच्या पुढे गेला आहे. येत्या ५ वर्षांत बँकेची उलाढाल १५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.

  • राष्ट्रीय योगदान व विमा संरक्षण: बँकेने गेल्या ५ वर्षांत ९६ कोटी रुपयांचा आयकर (Income Tax) भरून राष्ट्रउभारणीत योगदान दिले आहे. याशिवाय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ४५ लाख रुपयांचे विमा कवच उपलब्ध करून दिले आहे.

आपले मनोगत व्यक्त करताना सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख
आपले मनोगत व्यक्त करताना सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले, "आमच्या राजकारणाचा हेतू सहकार चळवळीला सक्षम करण्याचा आहे. पश्चिम महाराष्ट्राला टक्कर देण्याइतका बदल लातूरमध्ये झाल्याचे जिल्हा बँकेने आपल्या कामातून दाखवून दिले आहे. शुभमंगल योजना ८ ते १० वर्षांपूर्वी सुरू केली होती. आता या योजनेची कर्जमर्यादा वाढवण्यात येणार असून, पूर्वी असलेला ८ टक्के व्याजाचा दर आता थेट शून्य टक्के करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांचे अडणार नाही आणि जावईही रुसणार नाही, एवढे कर्ज या योजनेतून दिले जाईल."

जिल्हा बँकेमुळेच सहकार मंत्रीपदापर्यंत मजल: बाबासाहेब पाटील

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी १९८७ सालापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. लोकनेते विलासराव देशमुख यांनी दिलेल्या संधीमुळेच मी आज सहकार मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. धीरज देशमुख यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेचा मोठा विस्तार केला असून, ४३ पैकी १३ पुरस्कार त्यांच्याच कार्यकाळात मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, थकबाकी नसलेल्या आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या चालू बाकीदारांना २ लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गेल्या ५ वर्षांचा लेखाजोखा मांडला

पुढील ५ वर्षांत १५ हजार कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य: धिरज विलासराव देशमुख

बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गेल्या ५ वर्षांचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, सूत्रे हाती घेतली तेव्हा १० हजार कोटींची उलाढाल व १०० कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सध्या बँकेची उलाढाल ९,२०० कोटींवर पोहोचली असून १०० कोटींच्या पुढे ढोबळ नफा झाला आहे. आगामी ५ वर्षांत बँकेची उलाढाल १५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा विश्वास चेअरमन धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.

१,७८० कोटींचे पीककर्ज वाटप करूनही बँकेने ९९ टक्के वसुलीचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. कर्जासाठी कसलाही वशिला न लागणारी ही एकमेव बँक आहे.

आगामी काळात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने शेतकऱ्यांना घरबसल्या कर्ज व बँकिंग सुविधा दिल्या जातील. बँकेने गेल्या ५ वर्षांत ९६ कोटींचा आयकर (Income Tax) भरून राष्ट्रउभारणीत मोठे योगदान दिले असून, नोकरभरतीत १००% भूमिपुत्रांना संधी दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

भविष्यातील महत्त्वाचे नियोजन व मागण्या:

  • AI च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून कर्जवाटपासह सर्व सुविधा घरबसल्या देण्याचे नियोजन.

  • जिल्ह्याबाहेर शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास 'लातूर पॅटर्न' राबवणार.

  • बँकेच्या सध्या १२२ शाखा असून नवीन २५ ते ५० शाखांना मंजुरी देण्याची मागणी.

  • नोकरभरतीत १०० टक्के स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य.

  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ४५ लाख रुपयांचे विमा कवच.

या सर्वसाधारण सभेत कर्जमुक्ती योजनेतील योगदानाबद्दल सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच १०० टक्के वसुली करणाऱ्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी, गटसचिव आणि शाखा तपासणीसांचा गौरव करण्यात आला. सहकारमंत्र्यांच्या हस्ते संस्था सभासदांना ऑनलाईन लाभांशाचे (Dividend) वाटप करण्यात आले.

सभेला बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संचालक दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने, मारोती पांडे, पृथ्वीराज सिरसाठ, स्वयंप्रभा पाटील, अनुप शेळके, सपना किसवे यांच्यासह विविध सोसायट्यांचे चेअरमन, गटसचिव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे विषय वाचन कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले.

SCROLL FOR NEXT