मलकापूर: सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभाराने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कृष्णा सहकारी बँक लि., रेठरे बु. (मुख्य कार्यालय: मलकापूर) या बँकेने ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. बँकेच्या एकूण व्यवसायाने १,५१२.८९ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ठेवी आणि नफ्यामध्येही विक्रमी वाढ झाली आहे.
ठेवी आणि कर्जांमध्ये विक्रमी वाढ बँकेच्या ठेवींमध्ये गेल्या तीन वर्षांत सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. मार्च २०२४ मध्ये ६८३ कोटींवर असलेल्या ठेवी, मार्च २०२६ अखेर ९५१ कोटी ३५ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. केवळ ठेवीच नव्हे, तर बँकेने गरजू आणि उद्योजकांना दिलेल्या कर्जवाटपातही मोठी झेप घेतली असून, सध्या बँकेचे एकूण कर्जवाटप ५६१ कोटी ५४ लाख रुपये इतके आहे. ठेवी आणि कर्जाचे योग्य नियोजन केल्यामुळे बँकेचा सीडी रेशो ५९.०३% इतका संतुलित राहिला आहे.
'शून्य टक्के नेट एनपीए'ची हॅट्ट्रिक कृष्णा सहकारी बँकेच्या यशातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बँकेची कर्ज वसुली. अत्यंत कडक आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध वसुलीमुळे बँकेने सलग तिसऱ्या वर्षी आपला 'नेट एनपीए' (Net NPA) ०.००% म्हणजेच शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. ग्रॉस एनपीए मध्येही लक्षणीय घट होऊन तो २.९४% वर आला आहे. आजच्या काळात अनेक बँका थकबाकीमुळे अडचणीत असताना कृष्णा बँकेने सलग तीन वर्षे शून्य टक्के एनपीए राखून बँकिंग विश्वात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नफ्याचा चढता आलेख आणि भक्कम गुंतवणूक बँकेच्या निव्वळ नफ्यातही दरवर्षी मोठी वाढ होत असून, ३१ मार्च २०२६ अखेर बँकेला १२ कोटी २१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने आपली आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी ४५५ कोटी ३८ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. तसेच बँकेचा भांडवल आणि राखीव निधी मिळून होणारा 'स्वतःचा निधी' आता १३० कोटी ६३ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे, जो बँकेच्या भक्कम आर्थिक पायाचा पुरावा आहे.
ग्राहकसेवेला प्रथम प्राधान्य बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे तसेच सभासद आणि ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच ही गरुडझेप शक्य झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकस्नेही सेवा यामुळे कृष्णा सहकारी बँक सातत्याने प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत आहे.
बँकेच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जिल्ह्याच्या बँकिंग आणि सहकार क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.