कृष्णा सहकारी बँक ठरली नंबर १: मिळवला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार 
Co-op Banks

कृष्णा सहकारी बँकेला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट बँक' पुरस्कार जाहीर!

पारदर्शक कारभार आणि डिजिटल बँकिंगच्या जोरावर पटकावला 'दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन'चा मानाचा पुरस्कार.

Prachi Tadakhe

कराड : ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाला भक्कम आधार देत, सातत्याने आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभाराचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेने पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. 'दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन'च्या वतीने देण्यात येणारा या वर्षाचा राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट बँक' (प्रथम क्रमांक) पुरस्कार कृष्णा सहकारी बँकेला जाहीर झाला आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय व अत्यंत चमकदार कामगिरी करणाऱ्या बँकांच्या कार्याची दखल घेऊन महासंघाकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. वर्ष २०२५-२६ साठी ‘५०१ कोटी ते १००० कोटी ठेवी’ असणाऱ्या बँकांच्या गटातून कृष्णा बँकेची या सर्वोच्च बहुमानासाठी निवड करण्यात आली आहे.

१२ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये गौरव

या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे वितरण शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडी परिसरातील 'एक्सप्रेस इन हेरिटेज' येथे आयोजित विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या कुशल व दूरदृष्टी नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बँकेने वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करत ग्राहकांना 'मोबाईल बँकिंग'सारख्या अद्ययावत सोयीसुविधा अत्यंत सुरक्षितपणे उपलब्ध करून दिल्या आहेत.

कार्याचा विस्तार: आता ७ जिल्ह्यांत जाळे

सध्या बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये २७ शाखा आणि १ विस्तारित कक्षाद्वारे भक्कम जाळे पसरलेले आहे. बँकेचा वाढता आलेख आणि सुरक्षित आर्थिक व्यवस्थापन पाहून रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच ठाणे, सोलापूर आणि रत्नागिरी या आणखी तीन जिल्ह्यांत बँक विस्ताराला मंजुरी दिली आहे.

चार तत्त्वांवर आधारित यशस्वी प्रवास

  • उत्कृष्ट ग्राहक सेवा

  • कडक आर्थिक शिस्त

  • पारदर्शक कारभार

  • डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

या चतुःसूत्रीच्या जोरावर कृष्णा बँकेने लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

SCROLL FOR NEXT