कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; अध्यक्ष निपुणराव कोरे यांचे मार्गदर्शन. 
Co-op Banks

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनची ४७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न!

डिजिटल युगात डेटा सुरक्षा, AI व ब्लॉकचेन तंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज – अध्यक्ष निपुणराव कोरे

Prachi Tadakhe

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा असोसिएशनच्या प्रधान कार्यालयात अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष मा. निपुणराव कोरे होते.

सभेची सुरुवात सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

DPDP कायदा, AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान ही काळाची गरज

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मा. निपुणराव कोरे यांनी सदस्य बँकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. नागरी सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असोसिएशन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या डिजिटल युगातील आव्हानांवर बोट ठेवताना ते म्हणाले, "आजच्या काळात ग्राहकांचा डेटा (Data) सुरक्षित ठेवणे हे कायदेशीर बंधन बनले आहे. यासाठी DPDP (डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन) कायद्यानुसार बँकांनी पूर्वतयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ('AI') आणि ब्लॉकचेन (Block Chain) तंत्रज्ञानामुळे वित्तीय क्षेत्राचे स्वरूप वेगाने बदलत आहे. डिजिटल व्यवहारांमधील फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, ग्राहक सेवेचा दर्जा उंचावणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे."

सभेच्या सुरुवातीला सदस्य बँकांमधील दिवंगत कर्मचारी, सभासद तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मयत मान्यवरांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरेश रामराव शिंदे यांनी सभेचे प्रास्ताविक व स्वागत केले तसेच आर्थिक वर्षाच्या अहवालाचे वाचन केले. वार्षिक सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना उपस्थितांनी एकमताने मंजुरी दिली. ऐनवेळच्या विषयांमध्ये सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे व सूचनांचे निरसन करण्यात आले. याच कार्यक्रमात पारितोषिक समितीतील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

असोसिएशनच्या वतीने ठेव श्रेणीनुसार सदस्य बँकांना असोसिएशनच्या सर्व संचालकांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विजेत्या बँकांची यादी खालीलप्रमाणे:

  • गट क्र. १ (रु. १००० कोटींपेक्षा जास्त ठेवी): कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., इचलकरंजी

  • गट क्र. २ (रु. ५०१ ते १००० कोटी ठेवी): राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक लि., कागल

  • गट क्र. ३ (रु. २५१ ते ५०० कोटी ठेवी): दि कमर्शिअल को-ऑप बँक लि., कोल्हापूर

  • गट क्र. ४ (रु. १०१ ते २५० कोटी ठेवी): यड्राव को-ऑप बँक लि., यड्राव

  • गट क्र. ५ (रु. १०० कोटींपर्यंत ठेवी): सखाराम उर्फ दादा जोशी गणेश सहकारी बँक लि., कुरुंदवाड

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर आणि ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'कै. ॲड. शामरावजी शिंदे विशेष पुरस्कार' (कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक) दि इचलकरंजी मर्चेंट्स को-ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेला प्रदान करण्यात आला.

सभेच्या शेवटी असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. विठ्ठल मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस जिल्ह्यातील सदस्य बँकांचे संचालक, पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT