कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपोटी तब्बल सव्वा आठ कोटी, तर जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या गट सचिवांनाही बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी रुपये आदा केले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांसह गटसचिवांत आनंदाचे वातावरण आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बँकेने ही सर्व रक्कम बँक कर्मचारी व गट सचिवांच्या सेव्हिंग खात्यांवर वर्ग केली आहे.
जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या एकूण मूळ पगार व महागाई भत्त्याच्या ९ टक्केच्या प्रमाणात होणारी ही एकूण रक्कम आठ कोटी २७ लाख ४७ हजार १२० रुपये आहे. एकूण दीड हजारांवर कर्मचाऱ्यांत बँकेकडे कायम कर्मचाऱ्यांची संख्या १,१९८ आहे. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी संख्या २१ व कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या २७२ आहे. अशा एकूण १,४९१ कर्मचाऱ्यांना बँकेने ९ टक्केप्रमाणे हा दिवाळी बोनस आदा केला.
जिल्हा बँकेचे सभासद या नात्याने गावागावांत कार्यरत असलेल्या विकास सेवा संस्था संलग्न आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून कर्ज वाटप, वसुली, व्याज परतावा योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील गट सचिव अग्रेसर असतात. केंद्र शासनाने राबविलेल्या संस्थांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १,७५१ विकास संस्थांमध्ये कामकाज गतीने सुरू आहे. यातही गट सचिवांचे योगदान मोठे आहे. याचा विचार करून गटसचिवांनाही दिवाळीसाठी बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी रुपये आदा केले आहेत. जिल्ह्यात गावागावांत एकूण १,९३१ विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. या सर्व विकास सेवा संस्थांमधून काम करणाऱ्या गटसचिवांची संख्या ९२७ आहे. त्यांना आदा केलेल्या बक्षीस पगाराची ही रक्कम दोन कोटी १४ लाख ९८ हजार ७१७ रुपये होते.