2008 नंतर प्रथमच बिनविरोध निवडणूक 
Co-op Banks

दि कल्याण जनता सहकारी बँकेची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

ॲड. संपदा कुलकर्णी बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

Prachi Tadakhe

कल्याण येथील अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या दि कल्याण जनता सहकारी बँकच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सन 2008 नंतर प्रथमच बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सहकार क्षेत्रात याची विशेष नोंद घेण्यात येत आहे.

सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मान्यतेनंतर निवडणूक प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये 12 सर्वसाधारण, 2 महिला आणि 1 अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी अशा एकूण 15 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळातून ॲड. संपदा कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, बँकेच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या संचालिका म्हणून कार्यरत असून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. त्यांना कायद्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

उपाध्यक्षपदी श्री. महेश देशपांडे यांची निवड करण्यात आली असून, मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवीन संचालक मंडळात सनदी लेखापाल (CA) म्हणून श्री. प्रकाश कपुरिया, श्री. सौरभ जोशी आणि सौ. रेवा प्रभुदेसाई यांचा समावेश आहे. तसेच, बांधकाम क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक श्री. मकरंद केळकर व श्री. प्रकाश लेले यांचा सहभाग असून, श्री. केळकर यांना पूर्वीच्या संचालकपदाचा अनुभव आहे.

शैक्षणिक क्षेत्रातून डॉ. बिपिनचंद्र वाडेकर (प्राचार्य, बिर्ला नाईट कॉलेज) यांचा समावेश आहे. व्यवस्थापन, उद्योग व बँकिंग क्षेत्रातील अनुभवी सदस्य म्हणून श्री. सुशीलकुमार मुळ्ये, श्री. शेखर प्रभू व श्री. अमोल कौलगुड यांची निवड झाली आहे. याशिवाय उद्योजक श्री. रविंद्र धारणे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. चंद्रशेखर तांबडे व डॉ. अस्मिता मोडक तसेच माजी सैनिक श्री. प्रवीण गमरे (कारगिल युद्ध अनुभवी) यांचा संचालक मंडळात समावेश आहे.

या बिनविरोध निवडीमुळे कल्याण परिसरात समाधानाचे वातावरण असून, नव्या संचालक मंडळाकडून बँकेच्या प्रगतीसाठी प्रभावी व पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT