भारत सरकारची एचपीसीएल कंपनी भागीदारी करणार  
Co-op Banks

ग्रामीण भागातील पतसंस्था एल पी जी कनेक्शन साठी कर्जे उपलब्ध करणार

ग्रामीण व कमी उत्पन्न गटासाठी ‘मायक्रो फायनान्स’ उपक्रमाची सुरुवात

Vijay Chavan

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या पार्श्वभूमीवर, ग्रामीण आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना स्वच्छ इंधन व आर्थिक सक्षमीकरण देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि राज्यातील सहकारी पतसंस्था यांच्यात सहकार्याचा मार्ग खुला झाला आहे.

पश्चिम विभाग, मुंबई येथील एचपीसीएलचे महाव्यवस्थापक (एलपीजी) श्री. संदीप गुप्ता यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेत, जिल्हा व विभागीय सहनिबंधकांना आपल्या कार्यक्षेत्रातील पतसंस्थांमार्फत या उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रस्तावातील मुख्य वैशिष्ट्ये :

  • लघुवित्त (Micro Finance) : पतसंस्थांच्या सभासदांना घरगुती व बिगर-घरगुती एलपीजी कनेक्शन, गॅस रिफिल तसेच उपकरण खरेदीसाठी (स्टोव्ह, सुरक्षा होसेस, सेफ्टी एप्रन इ.) लहान कर्जे उपलब्ध होतील.

  • कर्जाची थेट अंमलबजावणी : पतसंस्थांकडून मंजूर कर्जाची रक्कम थेट एचपीसीएल वितरकांना हस्तांतरित केली जाईल, ज्यामुळे प्रक्रियेतील पारदर्शकता व गती वाढेल.

  • अतिरिक्त सेवा : एलपीजी कनेक्शनसाठी वित्तपुरवठा, रिफिल कर्ज, उपकरण खरेदी कर्ज यामुळे सभासदांना सोयिस्कर पर्याय उपलब्ध होतील.

  • जागृती मोहिमा : ग्रामीण भागात एलपीजीच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दारोदार मोहिमा राबविण्याचा विचारही प्रस्तावात आहे.

उपक्रमाचे उद्दिष्ट :

या भागीदारीद्वारे ग्रामीण व कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देणे, तसेच महिलांना पारंपरिक इंधनापासून मुक्तता देणे हा महत्त्वाचा हेतू आहे. यामुळे आरोग्याचे धोके कमी होऊन जीवनमान सुधारेल, तसेच पतसंस्थांमार्फत उपलब्ध होणाऱ्या लघुवित्तामुळे आर्थिक सक्षमीकरणाची नवी संधी निर्माण होईल.

एचपीसीएलची भूमिका :

एचपीसीएल ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून, देशभरात तिचे २२,०५० रिटेल आउटलेट्स आणि ६,३५३ एलपीजी वितरक आहेत. महाराष्ट्रातच तिचे ८१६ वितरकांचे जाळे असून, या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. कंपनीने यापूर्वीही ‘स्वच्छ इंधन – निरोगी जीवन’ हे ध्येय ठेवून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

शासनाचे निर्देश : सहकार आयुक्तालय, पुणे यांनी जाहीर केलेल्या पत्रानुसार, एचपीसीएलच्या प्रतिनिधींनी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधल्यास विभागीय व जिल्हा सहनिबंधकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पतसंस्थांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे आणि आवश्यक सहकार्य द्यावे.

अपेक्षित परिणाम :

  • ग्रामीण आणि वंचित घटकांना एलपीजी कनेक्शन मिळण्याचा वेग वाढेल.

  • पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होईल.

  • पतसंस्थांना नवे सदस्य आणि भांडवल मिळण्याची संधी.

  • पर्यावरणपूरक, स्वच्छ व सुरक्षित ऊर्जा वापरास चालना.

एकूणच, एचपीसीएल आणि सहकारी पतसंस्थांमधील ही भागीदारी ग्रामीण भागासाठी ‘ऊर्जा–सक्षमीकरण’ाचे नवे मॉडेल ठरू शकते.
एलपीजी सेवा वाढविण्यासाठी एचपीसीएल आणि सहकारी पतसंस्थामधील सहकार्याच्या प्रस्तावाबाबत.pdf
Preview
SCROLL FOR NEXT