प्रति पृष्ठ ५ रुपये शुल्क 
Co-op Banks

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दस्तऐवजांसाठी शुल्क निश्चित

सहकार आयुक्तांकडून दर जाहीर; बहुतांश दस्तऐवजांसाठी प्रति पृष्ठ ५ रुपये शुल्क

Vijay Chavan

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दस्तऐवजांच्या छायाप्रती सदस्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी निश्चित केले आहे. यासंदर्भात १८ सप्टेंबर २०२६ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५४ब-८ मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दस्तऐवजांचे निरीक्षण करण्याच्या सदस्यांच्या हक्काची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार संस्थेच्या प्रत्येक सदस्याला संस्थेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळेत किंवा त्यासाठी निश्चित केलेल्या कोणत्याही वेळी संस्थेचे विविध दस्तऐवज, पुस्तके व अभिलेख विनामूल्य पाहण्याचा अधिकार आहे.

यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व नियम, संस्थेचे उपविधी, शेवटचा लेखापरीक्षित वार्षिक ताळेबंद, नफा-तोटा लेखा, समितीच्या सदस्यांची यादी, सभासदांची नोंदवही, सर्वसाधारण सभा व समितीच्या बैठकीची कार्यवृत्ते तसेच संबंधित सदस्याने संस्थेशी केलेल्या व्यवहारांची नोंद असलेली पुस्तके व अभिलेख यांचा समावेश आहे.

मात्र, सदस्याने या दस्तऐवजांच्या छायाप्रतींची मागणी केल्यास त्यासाठी निबंधकाने विहित केलेले शुल्क आकारणे आवश्यक आहे. त्यानुसार सहकार आयुक्त व निबंधकांनी विविध दस्तऐवजांच्या छायाप्रतींसाठी शुल्काचे दर निश्चित केले आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ यांच्या प्रतीसाठी पुस्तकावर नमूद केलेल्या दराप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. तर संस्थेच्या उपविधीची प्रत, शेवटचा लेखापरीक्षित वार्षिक ताळेबंद, नफा-तोटा लेखा, समिती सदस्यांची यादी व सभासद नोंदवही, सर्वसाधारण सभा व समितीच्या बैठकीची कार्यवृत्ते तसेच सभासदाने संस्थेशी केलेल्या व्यवहारांची नोंद असलेल्या पुस्तके व अभिलेखांच्या भागांच्या छायाप्रतीसाठी प्रति पृष्ठ ५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

या शुल्क दरामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सदस्यांनी दस्तऐवजांच्या छायाप्रती मागितल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे. दस्तऐवजांचे निरीक्षण करण्याचा सदस्यांचा अधिकार विनामूल्य राहणार असून, त्यांची छायाप्रत उपलब्ध करून देताना विहित शुल्क आकारले जाणार आहे.

सदर परिपत्रकाच्या योग्य अंमलबजावणीसाठी विभागीय सहनिबंधक, सहनिबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना पाठविण्यात आले आहे. हे परिपत्रक सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सह.गृह.दस्तऐवज छायाप्रती शुल्क विहित परिपत्रक 17-09-2026.pdf
Preview
SCROLL FOR NEXT