गृहकर्जदारांसाठी सुवर्णसंधी! EMI कमी करण्यापेक्षा ‘हा’ पर्याय निवडल्यास १८ लाखांची बचत शक्य 
Co-op Banks

गृहकर्जदारांसाठी सुवर्णसंधी! EMI कमी करण्यापेक्षा ‘हा’ पर्याय निवडल्यास १८ लाखांची बचत शक्य

RBI च्या रेपो दर कपातीचा थेट फायदा फ्लोटिंग रेटवरील गृहकर्जांना मिळत असून, EMI कमी करण्याऐवजी जुना हप्ता कायम ठेवल्यास कर्जदारांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

Prachi Tadakhe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात सलग तिसऱ्यांदा कपात करत तो ५.२५ टक्क्यांवर आणला आहे. २०२५ या वर्षात एकूण १२५ बेसिस पॉईंट्सची घट झाल्याने गृहकर्जदारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते केवळ EMI कमी करून आनंद मानण्यापेक्षा एक स्मार्ट पर्याय निवडल्यास कर्जदारांना लाखोंची बचत करता येऊ शकते.

रेपो दर कपात म्हणजे गृहकर्जदारांना काय फायदा?

रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांचा निधी स्वस्त होतो आणि त्याचा थेट फायदा फ्लोटिंग रेटवरील गृहकर्जांना मिळतो. परिणामी, गृहकर्जावरील व्याजदर कमी होऊन मासिक हप्त्यात (EMI) घट होते.

२५ बेसिस पॉईंट्स कपातीचे गणित : ५० लाख रुपयांचे गृहकर्ज

समजा, तुम्ही ५० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी ७.५० टक्के व्याजदराने घेतले आहे. रेपो दर कपातीनंतर हा दर ७.२५ टक्के झाल्यास त्याचा परिणाम असा होतो :

७.५० टक्के व्याजदर असताना तुमचा मासिक हप्ता सुमारे ४०,२८० रुपये येतो. या दराने २० वर्षांत तुम्हाला एकूण ४६.६७ लाख रुपये व्याज भरावे लागते.

व्याजदर ७.२५ टक्क्यांवर आल्यानंतर मासिक हप्ता घटून सुमारे ३९,५२० रुपये होतो. म्हणजेच दरमहा सुमारे ७६० रुपयांची बचत होते. या नव्या दराने २० वर्षांत भरावे लागणारे एकूण व्याज ४४.८४ लाख रुपये इतके राहते.

या बदलामुळे गृहकर्जाच्या संपूर्ण कालावधीत कर्जदाराला सुमारे १.८ लाख रुपयांची एकूण बचत होते.

EMI कमी न करता ‘हा’ पर्याय का महत्त्वाचा?

बहुतेक कर्जदार EMI कमी झाल्यावर समाधानी होतात. मात्र, अर्थतज्ज्ञांचा सल्ला वेगळा आहे.
जर तुम्ही कमी झालेला EMI स्वीकारण्याऐवजी जुना हप्ता कायम ठेवला, तर कर्जाचा कालावधी आपोआप कमी होतो. यामुळे व्याजावर होणारी बचत लक्षणीयरीत्या वाढते.

वरील उदाहरणात, हप्ता कायम ठेवल्यास

  • कर्जाची मुदत लवकर संपते

  • एकूण व्याज बचत ₹1.8 लाखांवरून थेट ₹4 लाखांपर्यंत जाऊ शकते

२०२५ मधील एकूण दरकपातीचा ‘मॅजिक इफेक्ट’

ज्या कर्जदारांचे गृहकर्ज यावर्षी ८.५% वरून ७.२५% पर्यंत आले आहे, त्यांच्यासाठी ही खरी पर्वणी ठरली आहे.

  • EMI मधील बचत : दरमहा सुमारे ₹3,800 ते ₹3,900

  • हप्ता कायम ठेवल्यास :

    • कर्जाची मुदत ३ वर्षांहून अधिक (४० ते ४५ महिने) कमी

    • एकूण व्याज बचत : तब्बल ₹18 लाखांपर्यंत

बँका हा फायदा कधी देणार?

  • रेपो-लिंक्ड कर्जे : ३० ते ६० दिवसांत नवीन दर लागू

  • MCLR आधारित कर्जे : पूर्ण एक तिमाही लागू शकते

त्यामुळे पुढील दोन महिन्यांत बँकेकडून मिळणारे नवीन रिपेमेंट शेड्यूल नक्की तपासा.

गृहकर्ज ट्रान्सफर (Refinancing) करणे फायदेशीर ठरेल का?

जर तुमचा सध्याचा गृहकर्ज दर बाजारातील नव्या दरापेक्षा ०.५०% किंवा त्याहून जास्त असेल, तर कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याचा विचार करायला हवा.
थोडी प्रोसेसिंग फी भरावी लागली तरी दीर्घकालीन बचत लक्षणीय असते.

गृहकर्जदारांसाठी महत्त्वाची चेकलिस्ट

1. बँकेने रेपो दर कपातीचा फायदा दिला आहे का, तपासा
2. शक्य असल्यास EMI न बदलता कर्जाची मुदत कमी करण्यासाठी अर्ज करा
3. फ्लोटिंग रेट कर्ज असल्यास दर नियमित तपासत राहा
4. बँक फायदा देत नसेल, तर कर्ज स्विच करण्याचा विचार करा

रेपो दर कपात ही केवळ EMI कमी करण्याची संधी नाही, तर योग्य नियोजन केल्यास लाखोंची बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. थोडी आर्थिक शिस्त आणि योग्य निर्णय घेतल्यास गृहकर्ज लवकर फेडून भविष्यातील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

SCROLL FOR NEXT