'हस्ती बँके'चा थेट राष्ट्रीय स्तरावर धमाका; आता मिळणार 'या' प्रगत डिजिटल सेवा! 
Co-op Banks

हस्ती बँक झाली 'मल्टीस्टेट'! आता थेट शेड्यूल्ड बँकेचे लक्ष्य!

आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासू प्रवासाचा नवा टप्पा - आता महाराष्ट्राबाहेरही विस्तार! थेट गुजरातमध्ये सुरू होणार नवीन शाखा; वाचा काय होणार ग्राहकांना फायदा...

Prachi Tadakhe

दोंडाईचा : उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात आपल्या विश्वासार्हतेचा आणि पारदर्शकतेचा ठसा उमटवणाऱ्या 'दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दोंडाईचा' या बँकेने मानाचा तुरा रोवला आहे. प्रगत बँकिंग सेवा आणि ग्राहकांच्या भक्कम विश्वासाच्या जोरावर बँकेला भारत सरकारच्या सहकार मंत्रालयांतर्गत केंद्रीय सहकारी संस्था निबंधक (CRCS), नवी दिल्ली यांच्याकडून 'मल्टीस्टेट सहकारी बँक' म्हणून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मान्यतेमुळे हस्ती बँकेने राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीचे पहिले आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

  • ग्रामीण भागातून अत्यंत साधेपणाने सुरू झालेल्या हस्ती बँकेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. हस्तीमलजी जैन यांच्या दूरदर्शी विचारांतून आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वातून या बँकेची पायाभरणी झाली. आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या चतुःसूत्रीच्या बळावर बँकेने आज हे यश संपादन केले आहे.

मल्टीस्टेटचा दर्जा मिळाल्यामुळे बँकेला आता भौगोलिक मर्यादा ओलांडता येणार असून, बँक लवकरच गुजरात राज्यात आपला पहिला आंतरराज्य विस्तार करणार आहे.

मल्टीस्टेट दर्जामुळे बँकेला होणारे फायदे:

  • शाखा विस्तार: महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांमध्ये नवीन शाखा सुरू करण्याचा मार्ग मोकळा.

  • व्यवसाय वृद्धी: ठेवी आणि कर्ज व्यवसायाचा परीघ मोठ्या प्रमाणावर वाढणार.

  • डिजिटल बँकिंग: अत्याधुनिक डिजिटल सेवांचे आणखी बळकटीकरण होणार.

  • रोजगार निर्मिती: नव्या राज्यांमध्ये विस्तारामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार.

'शेड्यूल्ड बँक' हेच पुढील ध्येय: चेअरमन कैलास जैन

बँकेचे चेअरमन कैलास चंद्रकांत जैन यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की,

"दि हस्ती को-ऑप. बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाल्यामुळे बँकेचे प्रेरणास्थान स्व. कांतीलालजी जैन यांनी पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. हा दर्जा आमच्यासाठी केवळ एक सन्मान नसून, ग्राहकांप्रती असणाऱ्या अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा टप्पा आहे. आता त्यांचे दुसरे स्वप्न म्हणजे हस्ती बँकेला 'शेड्यूल्ड बँक' बनवणे, यासाठी आमचे संपूर्ण संचालक मंडळ आणि व्यवस्थापन कटिबद्ध असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. बँकेचे व्हाईस चेअरमन संजय दुग्गड, सर्व संचालक, सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित योगदानामुळेच हे यश शक्य झाले आहे."

बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन मदन जैन यांनी या यशाचे श्रेय टीमवर्कला दिले. ते म्हणाले,

"मल्टीस्टेट मान्यता हा बँकेच्या प्रगतीतील मैलाचा दगड आहे. आगामी काळात अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञानाधारित बँकिंग सेवा व्यापक स्वरूपात देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत."

बँकेला ही मल्टीस्टेटची परवानगी मिळवून देण्यासाठी बँकेचे सीईओ सतीश जैन, बँकिंग तज्ज्ञ उल्हास रत्नपारखी आणि माजी सीईओ प्रकाश कुचेरिया यांनी विशेष आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले.

बँकेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बँकेचे उपाध्यक्ष संजय दुग्गड, संपूर्ण संचालक मंडळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद आणि ग्राहकांकडून आनंदोत्सव साजरा केला जात असून, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून आणि सहकार क्षेत्रातून हस्ती बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातून उगम पावलेली एक सहकारी बँक जेव्हा आपल्या पारदर्शक कारभाराच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेते, तेव्हा तो संपूर्ण सहकार क्षेत्राचा गौरव असतो. हस्ती बँकेने मिळवलेला मल्टीस्टेटचा दर्जा हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला अभिमान वाटायला लावणारा आहे.

SCROLL FOR NEXT