कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) २०२६ पासून आपल्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे डिजिटल बदल लागू केले असून, त्यामुळे ईपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक झाली आहे.
पूर्वी नाव, आधार, पॅन किंवा बँक खात्यातील किरकोळ चुकांमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे क्लेम महिनोन्महिने प्रलंबित राहत होते. मात्र, नव्या डिजिटल सिस्टीममध्ये अर्ज करतानाच अशा तांत्रिक चुका समोर येत असल्याने कर्मचाऱ्यांना त्या त्वरित दुरुस्त करता येणार आहेत.
नव्या प्रणालीत आधार, पॅन आणि बँक खात्याचे EPFO शी लिंकिंग अचूक नसेल तर अर्जाच्या वेळीच सूचना दिली जाते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे क्लेम फेटाळल्यानंतरच चूक कळण्याचा त्रास आता टळणार आहे. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास ऑटो-सेटलमेंट प्रणालीद्वारे काही दिवसांतच ईपीएफची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.
दरम्यान, सलग दोन महिने बेरोजगार असल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा बांधकाम तसेच वैद्यकीय उपचार यांसारख्या कारणांसाठीही ईपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.
EPFO च्या या नव्या डिजिटल सुधारणांमुळे कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, ईपीएफची रक्कम आता गरजेच्या वेळी सहज आणि जलद उपलब्ध होणार आहे.