दापोली अर्बन बँकेचा देशभरात डंका! रिझर्व्ह बँकेचे नियम पाळणारी राज्यातील पहिली बँक 
Co-op Banks

दापोली अर्बन बँकेचा प्रगतीचा आलेख उंचच; ४ कोटी ६८ लाखांचा नफा

६७ व्या वार्षिक सभेत ९% लाभांश जाहीर; ८७0 कोटींचा व्यवसाय पार करत रिझर्व्ह बँकेच्या निकषांत अव्वल.

Prachi Tadakhe

दापोली : आपल्या देदीप्यमान वाटचालीद्वारे प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत ठेवणाऱ्या दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोली या बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ९ ऑगस्ट) नवभारत छात्रालय, सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह येथे उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेने रु. ४,६८,६१,७००/- इतका घसघशीत निव्वळ नफा मिळवला असून, भागधारकांना ९ टक्के लाभांश देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी केली.

सभेला बँकेचे तब्बल १२५0 भागधारक सभासद उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल सालात दिवंगत झालेल्या राजकीय व सामाजिक नेते, शहीद भारतीय जवान, बँकेचे माजी अध्यक्ष, सभासद, ग्राहक व हितचिंतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

८७0 कोटींहून अधिक व्यवसायाचा टप्पा

अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा ताळेबंद मांडताना सांगितले की, ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. ५२६ कोटी ९९ लाख तर एकूण कर्ज वाटप रु. ३४३ कोटी ६१ लाख झाले आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय आता ८७0 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात बँकेने ठेवींमध्ये १६ टक्के वाढ नोंदवली असून, वर्षासाठी निश्चित केलेले ५०० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या कामगिरीबद्दल उपस्थितांनी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. बँकेने आपला 'अ' ऑडीट वर्ग सातत्याने कायम राखला आहे.

बँकिंग क्षेत्रातील वाढत्या आव्हानांच्या काळात दापोली अर्बन बँकेने थकीत कर्ज वसुलीवर विशेष भर दिला आहे. परिणामी, बँकेचा ढोबळ एनपीए (Gross NPA) ३.१९ टक्के तर निव्वळ एनपीए (Net NPA) 0 टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करत बँकेने 'Eligibility Criteria for Business Authorization' (ECBA) हा दर्जा प्राप्त केला आहे. तसेच बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (CRAR) १३.२३ टक्के असून ते रिझर्व्ह बँकेच्या अनिवार्य १३ टक्के निकषापेक्षा अधिक आहे.

बँकिंग नियमन कायद्यातील कलम १० मधील बदलानुसार, ५१ टक्के संचालक शैक्षणिक अर्हता व अनुभवधारक आणि ४९ टक्के इतर पात्रताधारक असावेत, असा नियम आहे. या नियमानुसार आपल्या पोटनियमात (Bye-laws) सुधारणा करणारी दापोली अर्बन बँक ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिली बँक ठरली आहे, असा विशेष गौरव रिझर्व्ह बँकेच्या सुधारित पोटनियम समितीने केल्याचे अध्यक्षांनी अभिमानाने नमूद केले.

बँकेने आपल्या नफ्यातून सभासद आणि ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत:

  • विमा संरक्षण: रु. ५० हजारपेक्षा जास्त ठेव असणाऱ्या ठेवीदारांना रु. ५ लाखांचे आणि १ हजार रुपयांपेक्षा जास्त शेअर्स असणाऱ्या सभासदांना रु. २ लाखांचे अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे. यासाठी बँकेने स्वतःच्या उत्पन्नातून रु. ४१.९१ लाख विमा हप्ता भरला आहे.

  • आगामी योजना: अपघात विम्याची ही रक्कम लवकरच अनुक्रमे रु. ७ लाख आणि रु. ३ लाख करण्याबाबत संचालक मंडळ निर्णय घेणार आहे.

  • ठेव विमा संरक्षण: ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसी (DICGC) कडून मिळणाऱ्या विमा संरक्षणाचा हप्ताही बँकेने वेळेत भरला आहे.

विषयवार कामकाजापूर्वी बँकेच्या विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला:

  • डॉ. संदीप राजपुरे: 'डॉक्टरेट' पदवी मिळाल्याबद्दल.

  • श्री. सुधीर कालेकर व श्री. प्रितम रुके: 'समाजरत्न' व 'समाजभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल.

  • श्री. मनोज अनंत वणकर (कर्मचारी): बँकिंग क्षेत्रातील 'JAIIB' ही पदवी उत्तीर्ण केल्याबद्दल.

वार्षिक सभेपूर्वी सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. चिंतामणी वैजापूरकर यांनी मार्गदर्शन केले. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन करून अध्यक्ष जयवंत जालगांवकर आणि संचालक मंडळाच्या कुशल नेतृत्वामुळेच ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेतील विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सभासदांनी मांडलेल्या सूचनांची योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव थोरात यांनी विषयवार कामकाज पूर्ण केले, तर बँकेचे ज्येष्ठ संचालक माधव शेटवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT