डावीकडून बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, संचालक सचिन आपटे.  
Co-op Banks

Cosmos Bank Results 2026: ४४ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण

३,२१५ कोटींनी वाढल्या ठेवी; आता दक्षिण भारत आणि पश्चिम महाराष्ट्रात होणार मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तार.

Prachi Tadakhe

पुणे: सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात सर्वच आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. बँकेने ४४ हजार कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून, व्यवसायात १४ टक्क्यांची दमदार वाढ झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे येथील 'कॉसमॉस भवन' या मुख्य कार्यालयात बँकेचा वार्षिक प्रगती अहवाल सादर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आर्थिक कामगिरीचे प्रमुख मुद्दे:

  • एकूण व्यवसाय: बँकेचा एकूण व्यवसाय ५,३६६ कोटी रुपयांनी वाढून ४४,००० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

  • ठेवी: गेल्या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ३,२१५ कोटींची भर पडली असून, मार्च २०२६ अखेर एकूण ठेवी २६,१२२ कोटी रुपये झाल्या आहेत.

  • कर्ज वितरण: कर्ज पुरवठ्यात २,१५१ कोटींची वाढ होऊन एकूण कर्ज वितरण १७,८७८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

  • एनपीए (NPA) नियंत्रण: बँकेने मालमत्तेची गुणवत्ता राखण्यात यश मिळवले आहे. बँकेचा ढोबळ एनपीए (Gross NPA) ३.१०% तर निव्वळ एनपीए (Net NPA) अवघा ०.९०% इतका मर्यादित आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एकूण मंजूर कर्जाच्या ५०% वाटा ३ कोटी रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जांचा असणे आवश्यक आहे. कॉसमॉस बँकेने हे प्रमाण ५२.५२% पर्यंत नेऊन लहान उद्योजक आणि कर्जदारांना बळकट देण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

शाखा विस्तार आणि आगामी योजना

बँकेने नुकतीच गुजरात राज्यात १० नवीन शाखांची भर घातली आहे, ज्यामुळे तेथील एकूण शाखांची संख्या ३८ झाली आहे. सध्या ७ राज्यांमध्ये बँकेचे १९३ शाखांचे जाळे पसरलेले आहे. येणाऱ्या काळात दक्षिण भारत आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवीन शाखा सुरू करण्याचा मानस ॲड. कोकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे आणि बँकेचे इतर संचालक उपस्थित होते. सदर सर्व आकडेवारी ही लेखापरीक्षणपूर्व (Unaudited) असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

SCROLL FOR NEXT