संचालिका रेखा पोकळे,आरती ढोले,रसिका गुप्ता,अपेक्षिता ठिपसे, सीए यशवंत कासार,सीए दिलीप सातभाई,अध्यक्ष ॲड.प्रल्हाद कोकरे,संचालक सचिन आपटे,अरविंद तावरे,अजित गिजरे, डॉ. बाळासाहेब साठे 
Co-op Banks

कॉसमॉस बँकेचा १२० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

१२० वर्षांचा विश्वास, सहकार आणि आर्थिक सशक्तीकरणाचा गौरवशाली प्रवास

Prachi Tadakhe

पुणे : भारतीय सहकार चळवळीतील एक अग्रगण्य व विश्वासार्ह नाव असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या गौरवशाली वाटचालीचा १२० वा वर्धापनदिन दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. पुण्यातील विद्यापीठ रस्त्यावरील बँकेच्या मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात आयोजित या समारंभास सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक ‘तिळगूळ समारंभाने’ कार्यक्रमास प्रसन्न वातावरणाची जोड दिली. सहकार, विश्वास आणि सातत्य या मूल्यांवर उभ्या असलेल्या बँकेच्या दीर्घ प्रवासाचा गौरव यावेळी सर्वांनी अनुभवला.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमाच्या प्रारंभी २०२५–२६ या आर्थिक वर्षात चालू खाते–बचत खाते तसेच कर्जपुरवठा या विभागांमध्ये निर्धारित कालावधीत उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्यामुळेच बँकेची विश्वासार्हता अधिक दृढ होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बँकेने ४० हजार कोटींचा टप्पा पार केला

बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे यांनी उपस्थितांचे स्वागत करत बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी कॉसमॉस बँकेने ४०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा केली. ही बाब बँकेच्या सातत्यपूर्ण वाढीची, ग्राहकांच्या विश्वासाची आणि सक्षम व्यवस्थापनाची साक्ष देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीए दिलीप सातभाई यांनी ‘आर्थिक साक्षरता’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या आर्थिक वातावरणात विवेकी गुंतवणूक, योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण निर्णय किती आवश्यक आहेत, यावर त्यांनी भर दिला. विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध असताना भावनांऐवजी माहितीवर आधारित निर्णय घेणेच आर्थिक स्थैर्याचे गमक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

या वर्धापनदिन सोहळ्यास संचालक मंडळातील सर्व सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सह व्यवस्थापकीय संचालिका सौ. आरती ढोले यांनी केले, तर सौ. प्राची घोटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

१२ दशके पूर्ण करणारी कॉसमॉस बँक ही केवळ एक आर्थिक संस्था नसून, सहकार, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे या वर्धापनदिन सोहळ्याने अधोरेखित केले.

SCROLL FOR NEXT