येथील सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँकेतर्फे शहरातील सुपुत्र डॉ. संजय पाटील यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे, या राज्यातील शिखर संस्थेवर संचालकपदी झालेल्या निवडीनिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात डॉ. पाटील यांचा बँकेच्या अध्यक्षा कल्पना येवला, उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय पाटील म्हणाले की, "राज्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी व सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी सहकार प्रशिक्षण पदवी शिक्षणासाठी विद्यालय सुरू करण्याचा संकल्प केला आहे."
देशाच्या व सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासात सहकाराचे स्थान लक्षात घेता, ही चळवळ यशस्वी होण्यासाठी लवकरच हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येईल. वडिलधाऱ्यांच्या परंपरेतूनच प्रेरणा घेत मी सहकार क्षेत्रात योगदान देण्याचा निर्धार केला असून, आगामी काळात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहिल्यानगर या भागांमध्ये सहकार शिक्षण व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येईल. तसेच सहकारी संस्थांच्या बळकटीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रमेश देवरे, समको बँकेचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे, वास्तुविशारद शामकांत मराठे यांसह बँकेचे संचालक पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्नील बागड, व्ही. के. येवलकर, सचिन कोठावदे, महेश देवरे, अभिजीत सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रविण बागड, भास्कर अमृतकार, रूपाली कोठावदे, प्रकाश सोनग्रा, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, विजय भांगडिया, दत्तात्रेय कापुरे, पियुष येवला, व्यवस्थापक देविदास बागडे आदी उपस्थित होते.