भारतातील सहकारी बँकिंग प्रणालीत मोठा संरचनात्मक बदल: आधुनिक आव्हाने आणि भविष्यातील नवसंजीवनीचा मार्ग 
Co-op Banks

सहकारी बँकिंग २.०: नव्या धोरणांमुळे बँकिंगला मिळणार 'सुपरस्पीड'!

डिजिटल आव्हानांवर मात करत ग्रामीण आणि नागरी सहकारी बँका आता होणार अधिक सुरक्षित व स्वयंपूर्ण.

Prachi Tadakhe

भारतातील नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या सहकारी बँकिंग प्रणाली सध्या एका ऐतिहासिक आणि मोठ्या संरचनात्मक बदलातून जात आहेत. पूर्वीच्या जुन्या समस्यांवर मात करून या क्षेत्राला अधिक पारदर्शक व आधुनिक बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाने अनेक नवीन धोरणे लागू केली आहेत. मात्र, या बदलांच्या प्रक्रियेत सहकारी बँकांसमोर काही नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत, तर दुसरीकडे भविष्यातील प्रगतीचे नवे मार्गही खुले झाले आहेत.

१. डिजिटल युगातील आव्हाने आणि समस्या

  • सायबर सुरक्षेचा वाढता खर्च:

    सायबर हल्ले आणि ऑनलाईन फसवणुकीमुळे रिझर्व्ह बँकेच्या लागू कडक सायबर मानकांचे पालन करणे आणि त्यासाठी लागणारा मोठा आर्थिक खर्च पेलणे छोट्या बँकांसाठी कठीण जात आहे.

  • राष्ट्रीय ERP सॉफ्टवेअर स्वीकारताना तांत्रिक अडचणी:

    ग्रामीण भागातील ६१,००० हून अधिक PACS राष्ट्रीय 'एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग' (ERP) सॉफ्टवेअरवर आणले जात आहेत. त्यात अद्याप तांत्रिक कौशल्ये कमी पडत असल्याने सुरुवातीला तांत्रिक चुका आणि अडचणी उद्भवत आहेत.

  • कडक भांडवली नियमांमुळे नफ्यावर परिणाम:

    रिझर्व्ह बँकेने UCBs साठी भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR) आणि तरलतेचे (Liquidity) नियम सक्त केल्याने बँकांना आपले कर्जवाटप मर्यादित ठेवावे लागत असून त्यांच्या नफाक्षमतेवर (Profitability) थेट परिणाम होत आहे.

  • कर्जवसुलीच्या कडक आचारसंहितेचा परिणाम:

    कर्जवसुलीच्या नियमामुळे थकबाकीदारांकडून आणि व्यावसायिक कर्जदारांकडून वेळेत कर्जवसुली करणे बँकांसाठी आव्हानात्मक बनले आहे.

  • दुहेरी नियंत्रण (Dual Control):

    सहकारी बँकांवर राज्य सरकारचे 'सहकार निबंधक' (Registrar of Cooperative Societies) आणि 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) या दोघांचे नियंत्रण असते. त्यामुळे नियमात स्पष्टता राहत नाही व निर्णयात अडथळे निर्माण होतात.

    याशिवाय कृषी क्षेत्रातील अनिश्चितता, कर्जमाफीची अपेक्षा आणि राजकीय दबावामुळे दिलेली अनपेक्षित कर्जे यांमुळे या बँकांचे NPA (बुडीत कर्जे) वाढून बँकांची नफाक्षमता आणि कर्ज देण्याची क्षमता कमी होते. याशिवाय राजकीय हस्तक्षेप , गैरव्यवस्थापन , व्यावसायिक स्पर्धा असे अडथळे असले तरी NUCFDC सारख्या संस्थांच्या तंत्रज्ञानाची साथ घेऊन व RBI च्या अभिनव प्रयोग क्षमते मुळे नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

२. प्रगतीचा नवा दृष्टीकोन व नवी दिशा

  • NUCFDC द्वारे तांत्रिक व आर्थिक ढाल:

    नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन झालेली 'नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (NUCFDC) ही छत्री संस्था आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. यामुळे आता छोट्या बँकांना स्वतः कोट्यवधी रुपये खर्च न करता जागतिक दर्जाचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्थिक सहकार्य एकाच छताखाली उपलब्ध होत आहे.

  • २२ वर्षांनंतर नव्या विस्ताराची संधी:

    रिझर्व्ह बँकेने UCBs वर असलेली नवी लायसन्स बंदी हटवली असून विनापरवानगी १५% पर्यंत नवीन शाखा उघडण्याची मुभा दिली आहे. यामुळे या क्षेत्राचा विस्तार आता व्यावसायिक बँकांच्या धर्तीवर वेगाने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • PACS आता केवळ पतसंस्था नाही, तर बहुउद्देशीय आर्थिक केंद्र:

    ग्रामीण भागातील PACS आता केवळ शेती कर्जापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या 'कॉमन सर्व्हिस सेंटर' (CSC) आणि ग्रामीण गोदामे (Grain Storage) म्हणून काम करत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढले असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत आहेत.

  • केंद्रीय संगणकीकरणामुळे पारदर्शकता आणि गैरव्यवहारांना चाप:

    ग्रामीण संस्थांचे (PACS --> DCCB --> StCB) थेट नाबार्ड (NABARD) आणि रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली थेट जोडणी (Centralization) झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय हस्तक्षेप आणि कर्जांमधील संभाव्य गैरव्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चाप बसला आहे.

एकंदरीत, सध्या सहकारी बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने ही प्रामुख्याने तंत्रज्ञान स्वीकारणे आणि कडक नियमांची अंमलबजावणी करण्याशी संबंधित आहेत. परंतु, या शिस्तीमुळे आणि नव्या धोरणांमुळे सहकारी बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि आधुनिक बनून ग्राहकांचा विश्वास पुन्हा दृढ करत आहे.

SCROLL FOR NEXT