धनादेश  
Co-op Banks

४ ऑक्टोबरपासून चेक वटणार काही तासांत!

NPCI लागू करतेय सातत्यपूर्ण क्लिअरिंग प्रणाली

Pratap Patil

धनादेश (चेक) क्लिअरिंग (वटवणे) प्रणालीत आता मोठा बदल होणार आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून भारत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) अंतर्गत सातत्यपूर्ण दोन-टप्प्यांच्या धनादेश (चेक) क्लिअरिंग प्रणाली लागू करणार आहे. पहिल्या टप्प्यात, त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत क्लिअरन्स आवश्यक असेल. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सादर केलेले धनादेश स्कॅन करून पुष्टीसाठी पाठवले जातील. ठराविक मुदतीपर्यंत जर कोणताही धनादेश स्पष्टपणे नाकारला गेला नसेल, तर तो आपोआप मंजूर मानला जाईल आणि सकाळी ११ वाजल्यापासून दर तासाला त्याचे सेटलमेंट केले जाईल. ही नवी प्रणाली जुन्या बॅच-प्रोसेसिंग (टप्प्याटप्प्याने प्रक्रिया) पद्धतीच्या जागी लागू होणार आहे. तसेच, ३ जानेवारी २०२६ पासून या प्रणालीत आणखी कठोर "T+३ तासांत पुष्टी" कालावधी लागू होईल.

प्रमुख बदल आणि वेळापत्रक:

  • पहिला टप्पा (४ ऑक्टोबर २०२५ – २ जानेवारी २०२६):

  • प्रस्तुतीकरणाची वेळ: बँका सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत धनादेश स्कॅन करून पुष्टीसाठी पाठवतील.

  • पुष्टीची अंतिम मुदत: ज्याच्या खात्यातून पैसे द्यायचे आहेत (drawee / paying bank) त्या बँकेला सायंकाळी ७ वाजेपर्यंत धनादेशाची स्थिती (मंजूर किंवा नाकारणे) निश्चित करावी लागेल.

  • स्वयंचलित मंजुरी: सायंकाळी ७ वाजेपर्यंत पुष्टी न झालेला धनादेश आपोआप मंजूर मानला जाणार आहे.

  • सेटलमेंट: धनादेश मंजूर झाल्यावर, सेटलमेंटनंतर (निराकरण झाल्यानंतर) १ तासाच्या आत रक्कम खात्यात जमा होईल.

  • दुसरा टप्पा (३ जानेवारी २०२६ पासून):

  • पुष्टीसाठी कमी कालावधी: drawee बँकेला पुष्टीसाठीचा कालावधी कमी करून चेक मिळाल्यानंतर ३ तासांच्या आत पुष्टी केली जाणार आहे.

  • स्वयंचलित मंजुरी सुरूच: जर बँकेने ३ तासांच्या आत उत्तर (पुष्टी) दिले नाही, तर धनादेश आपोआप मंजूर मानला जाणार आहे.

यामुळे प्रणालीत कोणते बदल होतील?:

  • त्वरित निधी उपलब्धता: धनादेश क्लिअर होऊन पैसे खात्यात जमा होण्यासाठी लागणारा वेळ दिवसांवरून थेट तासांमध्ये कमी होईल.

  • सतत प्रक्रिया: धनादेश वटवण्याची प्रक्रिया दिवसाच्या शेवटी बॅचप्रमाणे नव्हे, तर ही प्रक्रिया दिवसभर सुरु राहणार आहे.

  • ग्राहकाची जबाबदारी: धनादेश लगेच मान्य किंवा नाकारला जाणार असल्यामुळे ग्राहकांना खात्यात पुरेसे पैसे असल्याची खात्री करावी लागणार आहे.

  • अतिरिक्त होल्ड पॉलिसीची (रक्कम वापरासाठी बँकेची रोख) शक्यता: मंजुरीनंतर निधी एका तासात जमा होईल, परंतु हे पैसे कधी वापरता येतील याबाबत तुमच्या बँकेच्या अंतर्गत धोरणांची चौकशी करावी लागणार आहे.

  • पॉझिटिव्ह पे: ५ लाखांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेशांसाठी पॉझिटिव्ह पे पुष्टी (खातेदाराकडून खात्री करणे) आवश्यक राहणार आहे.

SCROLL FOR NEXT