भरत बँकेची ५६ वी सभा खेळोमेळीत संपन्न 
Co-op Banks

भरत बँकेच्या प्रगतीचा भक्कम पाया आणि सामाजिक बांधीलकीचा समृद्ध वारसा

५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रगतीचा अहवाल सादर; सर्वसाधारण सभेत ३१७ कोटींच्या ठेवींसह ९% लाभांशाची घोषणा व मान्यवरांचा विशेष सन्मान.

Prachi Tadakhe

जयसिंगपूर : सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हतेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या श्री भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जयसिंगपूर यांची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे अत्यंत उत्साहपूर्ण व खेळोमेळीच्या वातावरणात पार पडली. बँक चेअरमन डॉ. श्रीवर्धन एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेने केवळ बँकेच्या भक्कम आर्थिक प्रगतीची साक्ष दिली नाही, तर सहकारातून समाजसेवेचा जो आदर्श संस्थापक कै. डॉ. एस. के. पाटील व कै. डॉ. जे. जे. मगदूम यांनी निर्माण केला होता, तो अधिक बळकट केल्याचे स्पष्ट केले.

सभेची सुरुवात बँकेचे संचालक पै. विठ्ठल बाबूराव मोरे यांच्या अहवाल वाचनाने झाली. त्यांनी मांडलेल्या विषयांना सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखाने मंजुरी दिली. रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे तंतोतंत पालन करत बँकेने अत्यंत पारदर्शक कारभार केला असून, यामुळेच बँकेचा पाया अधिक भक्कम झाला आहे.

ठेवी आणि कर्जवाटपात मोठी वाढ: बँकेच्या एकूण ठेवींमध्ये तब्बल ₹३७ कोटी ६२ लाख १३ हजारांची वाढ होऊन एकूण ठेवी ₹३१७ कोटी ४४ लाख इतक्या झाल्या आहेत. तर कर्जवाटपात ₹३४ कोटी ६८ लाख ७८ हजारांची वाढ होऊन चालू आर्थिक वर्षात एकूण कर्जवाटप ₹१९४ कोटी ७७ लाख ९१ हजार झाले आहे.

आर्थिक शिस्त व नफा: बँकेची एन.पी.ए. (NPA) टक्का शून्य (०%) तर थकबाकी केवळ २.२०% इतकी नियंत्रित राहिली आहे. बँकेला ₹१ कोटी ५८ लाख ८० हजार इतका निव्वळ नफा झाला असून, सभासदांसाठी ९% लाभांश घोषित करण्यात आला आहे.

सेवा व यश: बँक शिरोळ तालुक्यातील पहिली युपीआय (UPI) सेवा देणारी सहकारी बँक ठरली आहे. तसेच बँकेला या वर्षीही ‘अ’ ऑडीट वर्ग प्राप्त झाला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी समृद्धी आणि समाधानाचा मूलमंत्र उपस्थितांना दिला. ते म्हणाले:

"माणसाचे समाधान हे ४०% त्याच्या वृत्तीवर, ३०% भावनेवर आणि ३०% स्व-प्रयत्नांवर अवलंबून असते. माणूस आपल्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा अवास्तव अपेक्षांवर अधिक लक्ष केंद्रित करतो. अपेक्षांमध्ये लवचिकता ठेवल्यास अपेक्षाभंग होत नाही आणि जीवनात खरे समाधान मिळते."

तसेच सांगलीचे प्रसिद्ध रेडिऑलॉजिस्ट डॉ. नाटेकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिले रेडिऑलॉजिस्ट म्हणून काम करतानाचा अनुभव सांगताना, उपचाराचे पैसे नसलेल्या रुग्णांची सेवा करण्यात विठ्ठल दर्शनासारखाच आनंद मिळतो, अशी भावना व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी बँकेच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, “संस्थापकांनी ही बँक तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर आज भरत बँकेचे आरोग्य अत्यंत तंदुरुस्त आहे.” समाजऋण फेडण्याच्या भावनेतून बँक काम करत असल्याचा उल्लेख करत त्यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला.

भरत मेडिकल ट्रस्ट व बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला:

  1. डॉ. एस. के. पाटील धन्वंतरी पुरस्कार: डॉ. बाळासाहेब खुवाण्णा देवताळे (गणेशवाडी - कोरोना काळातील वैद्यकीय सेवेसाठी)

  2. डॉ. जे. जे. मगदूम समाजभूषण पुरस्कार: श्री. गोवर्धन दवडे (व्यवस्थापक, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, जयसिंगपूर - मोफत भोजन व व्यसनमुक्ती सेवेसाठी)

  3. श्री भरत रत्न पुरस्कार: श्री. रावसाहेब पुजारी (कृषी पत्रकार, संपादक व लेखक - शेतकरी हक्कांच्या कार्यासाठी)

पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी उत्तर देताना बँकेच्या ऋणात राहून पुढील आयुष्यात समाजासाठी अधिक निष्ठेने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी बँकेच्या निवड समितीचे सदस्य, तसेच इयत्ता १२ वीच्या आर्ट्स, कॉमर्स व सायन्स शाखेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि परिसरातील इतर विविध मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला बँकेचे संचालक डॉ. किरण वि. अणुजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर व्हा. चेअरमन श्री. प्रसन्न कुंभोजकर यांनी ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी बँकेच्या संचालकांनी उपस्थितांचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT