सर्व २१ शाखा नफ्यात; सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची साथ मोलाची - मुकुंदराव देसाई. 
Co-op Banks

जनता सहकारी बँक गाठणार ५०० कोटींचा टप्पा; ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन मुकुंदराव देसाई यांची ग्वाही; २१ ही शाखा नफ्यात, नवीन ४ शाखा सुरू करण्याचा मानस.

Prachi Tadakhe

आजरा: जनता सहकारी बँक सध्या भक्कम आर्थिक स्थितीत असून लवकरच बँक ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्वास चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी व्यक्त केला. बँकेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रास्ताविक करताना चेअरमन देसाई यांनी सांगितले की, बँकेचा व्यवसाय सध्या २१ शाखांच्या माध्यमातून सुरू असून सर्वच शाखा नफ्यात चालत आहेत. आगामी काळात बँकेच्या आणखी चार नवीन शाखा सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच, अहवाल सालात बँकेला ४ कोटी २५ लाखांचा निव्वळ नफा झाला असून, सभासदांसाठी १० टक्के लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी सभासदांनी आपली भाग रक्कम किमान एक हजार रुपये पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट शाखांचा गौरव

सभेत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी अहवालाचे वाचन केले. अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आजरा, कसबा वाळवे, सरवडे (ता. राधानगरी), बालिंगा (ता. कागल) आणि नूल (ता. गडहिंग्लज) या शाखांचा विशेष गौरव करण्यात आला. यासोबतच सभासद व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा उल्लेख करताना चेअरमन भावूक

भाषण करताना चेअरमन मुकुंदराव देसाई भावूक झाले. "संचालक व सभासदांनी दिलेल्या विश्वासाला जागून मी बँकेची धुरा सांभाळली. दिलेल्या शब्दांपैकी ९८ टक्के आश्वासने पूर्ण केली असून उर्वरित कामेही लवकरच मार्गी लावली जातील. गेल्या १५ वर्षांत कर्मचाऱ्यांना चार वेळा पगारवाढ दिली असून, लवकरच पाचवी वाढही दिली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.

सभेत सभासद तानाजी देसाई यांनी निवडणूक निधी व कर्ज वाटपाबाबत प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याची सूचना केली. त्यावर चेअरमन देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सभासदांच्या मागणीनुसार १० टक्के लाभांश जाहीर केल्याबद्दल तानाजी देसाई यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, तो एकमुखाने संमत झाला.

या सभेस बँकेचे ज्येष्ठ संचालक जयवंतराव शिंपी, महादेव टोपले, रणजित देसाई, शिवाजी पाटील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरिष देसाई, माजी चेअरमन वसंतराव धुरे, व्हा. चेअरमन अनिल फडके, तालुका संघाचे चेअरमन महादेव हेब्बाळकर, असिस्टंट जनरल मॅनेजर पी. ए. सरंबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हाईस चेअरमन अमित सामंत यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT