आजरा : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये ३५ शाखांचे विस्तृत जाळे असलेल्या आणि सुमारे १८०० कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., आजरा या मल्टी स्टेट बँकेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध पार पडली. अण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते मा. श्री. अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
आजरा अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी अशोक चराटी तर उपाध्यक्षपदी संजय चव्हाण यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा. श्री. अमोल येडगेसो (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर) यांनी काम पाहिले असून त्यांनी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. यावेळी मा. श्री. गजानन गुरवसो (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर), मा. श्री. प्रेम राठोडसो (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, करवीर) आणि मा. श्री. सुजय येजरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, आजरा) उपस्थित होते.
या निवडणुकीत १८ सदस्यीय संचालक मंडळात तब्बल ११ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने बँकेच्या नेतृत्वात नव्या विचारांचा आणि ऊर्जेचा समावेश झाला आहे. सहकार क्षेत्रात लोकशाही मूल्ये जपत सर्वसमावेशक नेतृत्व घडवण्याचा हा प्रयत्न म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये श्री. अशोक काशिनाथ चराटी, श्री. जयवंत यशवंत खराडे, श्रीमती शैला रामचंद्र टोपले, श्री. विजयकुमार लक्ष्मण पाटील, श्रीमती संध्याताई प्रकाश वाटवे, सौ. कुंदा सुरेश डांग, श्री. विनय भालचंद्र सबनीस, श्री. अशोक देवगोंडा पाटील, श्री. सागर रमेश कुरुणकर, श्री. सिद्धेश विलास नाईक, श्री. संजय विष्णू चव्हाण, श्री. आनंदा वासुदेव फडके, श्री. बसवराज विश्वनाथ महाळंक, श्री. ऋषिकेश दीपक सातोसकर, श्री. किशोर काशिनाथ भुसारी, श्री. किरण आप्पासाहेब पाटील, श्री. कान्होबा शंकर माळवे आणि श्री. सुनील माधवराव देशपांडे यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
स्व. काशिनाथ (अण्णा) चराटी आणि स्व. माधवराव (भाऊ) देशपांडे यांनी सहकारातील सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केलेल्या या बँकेने कालांतराने मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारदर्शक कारभार, सभासदकेंद्रित धोरणे आणि सातत्यपूर्ण प्रगतीमुळे आजरा अर्बन बँकेचा सहकार क्षेत्रात नावलौकिक आहे.
या निवडणुकीनंतर मनोगत व्यक्त करताना मा. श्री. अशोकअण्णा चराटी म्हणाले की, “हजारो सभासदांच्या विश्वासाच्या बळावर आम्ही सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध पार पाडू शकलो, याचे आम्हाला समाधान आहे. सभासदांना अधिक चांगल्या, आधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध राहील. लवकरच बँकेचा व्यवसाय २००० कोटी रुपयांच्या टप्प्यावर नेण्याचे आमचे ठाम उद्दिष्ट आहे.”
अध्यक्षपदासाठी अशोक चराटी यांचे नाव जयवंत खराडे यांनी सुचविले आणि सुनील देशपांडे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संजय चव्हाण यांचे नाव विनय सबनीस यांनी सुचविले आणि सिद्धेश नाईक यांनी अनुमोदन दिले. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीरसो आणि प्रशासन व बोर्ड विभाग प्रमुख श्री. नितीन बेल्लदसो यांनी बँक प्रशासनाच्या वतीने केला. या वेळी बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व संचालकांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.