बँकिंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्यासाठीही एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जनरेटिव्ह एआयच्या (Generative AI) माध्यमातून दैनंदिन कामांनाच प्रशिक्षणामध्ये रूपांतरित करणे शक्य होत असून, भविष्यातील बँकिंग व्यवस्थेसाठी अधिक सक्षम आणि Technosavy मनुष्यबळ तयार करण्याचा नवा मार्ग खुला होत आहे.
जगभरातील बँका कर्मचाऱ्यांच्या कामकाजात एआयचा समावेश करण्यासाठी विविध प्रयोग करत आहेत. बँक ऑफ अमेरिकाने 'एरिका फॉर एम्प्लॉईज' या एआय आधारित सुविधेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पासवर्ड रीसेट करणे, कर्मचारी लाभांविषयी माहिती मिळविणे आणि अंतर्गत प्रश्न सोडविणे यांसारख्या कामांमध्ये मदत उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे, डिजिटल बँक ग्रास हॉपरकडून गुगल जेमिनीचा वापर बैठकीच्या नोंदी तयार करणे, ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या संदेशांचे मसुदे तयार करणे आणि अंतर्गत संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी केला जात आहे.
या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांची जागा घेणे नसून, त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविणे हा आहे. त्यामुळे बँकिंग संस्थांनी एआयकडे कमी खर्चिक , कर्मचारी विकास आणि संस्थात्मक क्षमता वाढविण्याचे साधन म्हणून पाहणे आवश्यक आहे .
बँकिंग क्षेत्रात ग्राहकांशी थेट संवाद साधणारे कर्मचारी हे संस्थेच्या विश्वासार्हतेचे महत्त्वाचे प्रतिनिधी असतात. ग्राहकांच्या तक्रारी समजून घेणे, आर्थिक गरजांचे विश्लेषण करणे, योग्य उत्पादनांची माहिती देणे आणि समस्यांचे तत्पर निराकरण करणे यासाठी कर्मचाऱ्यांकडे संवादकौशल्य आणि विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
एआय आधारित प्रणाली ग्राहकांशी होणाऱ्या संभाषणांचे विश्लेषण करून त्यातील भावना, आवाजाचा सूर आणि ग्राहकांच्या अपेक्षा ओळखण्यास मदत करू शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्याचे मार्ग समजू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठेवीदाराला मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करायचे असल्यास, त्याच्या गरजेनुसार योग्य ठेव योजना किंवा इतर आर्थिक पर्यायांची माहिती देण्याची संधी कर्मचारी ओळखू शकतात.
नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांसाठी ही बाब विशेष महत्त्वाची आहे. कारण या संस्थांचे ग्राहकांशी असलेले नाते स्थानिक पातळीवर आणि वैयक्तिक विश्वासावर आधारित असते. एआयच्या मदतीने ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, तक्रारींचे विश्लेषण करणे आणि कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणे शक्य होऊ शकते. मात्र, अंतिम आर्थिक सल्ला आणि निर्णय घेताना कर्मचाऱ्यांचा अनुभव व मानवी संवाद महत्त्वाचा राहणार आहे.
Mock call training - एआयच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आभासी वातावरणात ग्राहकांशी संवाद साधण्याचा सराव करता येतो. याला एआय सिम्युलेशन किंवा रोल-प्ले प्रशिक्षण असे म्हटले जाते. यामध्ये एआय ग्राहकाची भूमिका बजावते आणि कर्मचारी प्रत्यक्ष ग्राहकांशी बोलत असल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देतात.
उदाहरणार्थ, एखादा ग्राहक कर्जाचा हप्ता थकल्यामुळे नाराज आहे, एखाद्या ठेवीदाराला व्याजदराविषयी शंका आहे किंवा ग्राहकाला डिजिटल बँकिंग व्यवहारात अडचण येत आहे, अशा विविध परिस्थिती एआयच्या माध्यमातून तयार करता येतात. कर्मचारी या परिस्थितींचा सामना करून आपली संवादकौशल्ये सुधारू शकतात. प्रशिक्षणानंतर त्यांना त्यांच्या उत्तरांमधील त्रुटी, संवादातील सुधारणा आणि ग्राहक हाताळण्याच्या पद्धतींबाबत अभिप्राय मिळू शकतो.
बँक ऑफ अमेरिकाच्या 'द अकॅडमी' या कर्मचारी प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास विभागाने एआय आधारित संभाषण सिम्युलेटरचा वापर केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, एका वर्षात कर्मचाऱ्यांनी १० लाखांहून अधिक प्रशिक्षण सिम्युलेशन पूर्ण केले. यामुळे प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सरावाची संधी मिळाली.
भारतीय सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्येही अशा प्रशिक्षण पद्धतींचा वापर करता येऊ शकतो. विशेषतः नवीन कर्मचारी, कर्ज विभागातील अधिकारी, वसुली कर्मचारी, ग्राहक सेवा प्रतिनिधी आणि शाखा व्यवस्थापक यांच्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते.
कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या सुरक्षिततेविषयी आणि भविष्यातील भूमिकेविषयी एआय मुळे चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एआयमुळे रोजगार कमी होणार की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढणार, याबाबत संस्थांनी स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांना एआयची उपयुक्तता, मर्यादा आणि सुरक्षित वापर याविषयी नियमित प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष कामात एआयचा वापर कसा करता येईल हे दाखविणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे अशा उपाययोजना करता येतील.
याशिवाय, ग्राहकांची वैयक्तिक माहिती, खाते क्रमांक, आर्थिक व्यवहार, कर्जविषयक कागदपत्रे आणि गोपनीय संस्थात्मक माहिती सार्वजनिक एआय प्लॅटफॉर्मवर टाकण्यास प्रतिबंध असणे आवश्यक आहे. संस्थेने मान्य केलेली सुरक्षित एआय प्रणाली, डेटा गोपनीयतेचे नियम आणि मानवी पडताळणीची व्यवस्था निश्चित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था मर्यादित मनुष्यबळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार हाताळतात. अनेक संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना बदलते बँकिंग नियम, डिजिटल सेवा, सायबर सुरक्षा, केवायसी, कर्ज प्रक्रिया आणि ग्राहक तक्रार निवारण यांचे नियमित प्रशिक्षण देण्याचे आव्हान असते. अशा परिस्थितीत एआय आधारित प्रशिक्षण व्यवस्था उपयुक्त ठरू शकते.
सहकारी संस्थांना पुढील बाबींमध्ये एआयचा वापर करता येऊ शकतो.
कर्मचारी प्रशिक्षण : बँकिंग नियम, केवायसी, कर्ज प्रक्रिया आणि ग्राहक सेवा यांवरील प्रश्नोत्तरे व प्रशिक्षण सत्रे तयार करणे.
ग्राहक संवाद : ग्राहकांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देण्याचा सराव आणि तक्रार निवारण कौशल्य विकसित करणे.
कर्ज विभाग : कर्ज अर्जांची प्राथमिक तपासणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रियेतील त्रुटी ओळखण्यासाठी सहाय्य.
सायबर सुरक्षा : फिशिंग ई-मेल, बनावट संदेश, डिजिटल फसवणूक आणि संशयास्पद व्यवहार ओळखण्याचे प्रशिक्षण.
नियमांचे अद्ययावतीकरण : रिझर्व्ह बँक आणि सहकार विभागाच्या नवीन परिपत्रकांचा अभ्यास करून कर्मचाऱ्यांना त्यातील महत्त्वाच्या तरतुदी समजावून देणे.
या सर्व प्रक्रियांमध्ये एआय हे सहाय्यक साधन म्हणून वापरणे आवश्यक आहे. कर्ज मंजुरी, आर्थिक जोखीम, कायदेशीर अनुपालन आणि ग्राहकांच्या खात्यांशी संबंधित अंतिम निर्णय सक्षम अधिकाऱ्यांनीच घ्यावेत.
एआय साधने संस्थेमध्ये सुरू केल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष फायदा किती झाला, हे तपासणे आवश्यक आहे. केवळ किती कर्मचाऱ्यांनी एआयचा वापर केला यावरून त्याची उपयुक्तता निश्चित करता येणार नाही. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होण्यास लागणारा वेळ, कर्ज अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी, कर्मचाऱ्यांच्या कामातील अचूकता, ग्राहक समाधान आणि प्रशिक्षणानंतरच्या कामगिरीत झालेली सुधारणा अशा निकषांवर परिणाम मोजता येऊ शकतो.
यामुळे एआयमुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढली का, प्रशिक्षणाचा दर्जा सुधारला का आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळाली का, याचे मूल्यांकन करता येईल.
बँकिंग क्षेत्रातील भविष्यातील स्पर्धा केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहणार नाही, तर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळावरही अवलंबून असेल. एआयमुळे नियमित आणि पुनरावृत्तीची कामे अधिक वेगाने होऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी संवाद, आर्थिक सल्ला, समस्या निराकरण आणि व्यावसायिक निर्णयक्षमता यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांनीही एआयचा वापर टप्प्याटप्प्याने सुरू करून कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण, सुरक्षित डिजिटल साधने आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून दिल्यास मनुष्यबळ अधिक सक्षम होऊ शकते. भविष्यातील बँकिंग व्यवस्थेत एआय आणि मानवी कौशल्ये यांचा समन्वय साधणाऱ्या संस्थांनाच अधिक प्रभावी ग्राहक सेवा आणि शाश्वत विकास साधता येईल.