आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र राहिले नसून, बँक खाते, पॅन कार्ड, मोबाईल नंबर तसेच विविध सरकारी योजनांशी थेट जोडलेले महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. मात्र, याच आधार कार्डचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती रिकामी करत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
सायबर गुन्हेगार आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) चा गैरवापर करून फिंगरप्रिंट्स किंवा डोळ्यांच्या स्कॅनद्वारे थेट बँक खात्यातील पैसे काढत असल्याचे आढळून आले आहे. अनेक वेळा आधारशी लिंक असलेले बँक खाते आणि मोबाईल नंबर हे फसवणुकीचे मुख्य लक्ष्य ठरत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांची एक छोटीशी चूकही मोठ्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकते.
आधार कार्डमध्ये व्यक्तीची वैयक्तिक माहिती, बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) आणि डोळ्यांचे स्कॅन (आयरिस) अशी बायोमॅट्रिक माहिती असते. या माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने बायोमॅट्रिक लॉक ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एकदा का बायोमॅट्रिक लॉक केल्यानंतर, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे फिंगरप्रिंट्स किंवा आयरिस स्कॅन वापरून कोणताही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे ही सुविधा प्रत्येक आधारधारकासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (UIDAI वेबसाइट) जा.
होमपेजवरील ‘My Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
‘Aadhaar Services’ विभागात जाऊन ‘Lock/Unlock Biometrics’ निवडा.
तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
बायोमॅट्रिक लॉकिंगसमोर टिक करा आणि ‘Enable’ बटणावर क्लिक करा.
गरज असल्यास ही सुविधा तात्पुरती अनलॉकही करता येते.
हॉटेल बुकिंग, प्रवास किंवा ओळखीचा पुरावा देताना आधारची प्रत द्यावी लागते. अशा वेळी ‘मास्क्ड आधार’ वापरणे सर्वाधिक सुरक्षित ठरते.
मास्क्ड आधारमध्ये आधार क्रमांकाचे पहिले ८ अंक लपवलेले असतात (उदा. xxxx-xxxx-1234) आणि फक्त शेवटचे ४ अंक दिसतात. त्यामुळे तुमची संपूर्ण ओळख उघड होत नाही आणि गैरवापराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
कधीही आधार कार्ड किंवा त्याची फोटो प्रत सोशल मीडियावर शेअर करू नका.
सायबर कॅफेमध्ये आधार डाऊनलोड केल्यास, फाईल त्वरित डिलीट करा.
आधारशी संबंधित कोणताही ओटीपी अनोळखी व्यक्तीला सांगू नका.
संशयास्पद कॉल, लिंक किंवा मेसेजपासून दूर राहा.
सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना, आधार बायोमॅट्रिक लॉक ही सुविधा प्रत्येक नागरिकासाठी संरक्षणाची कवच ठरू शकते. थोडीशी खबरदारी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे आजच तुमचा आधार सुरक्षित करा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.